नवीन कोरोना रुग्ण ५०च्या खाली

ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांची वाढ ५०पेक्षा कमी झाली असून आज अवघे ४०नवीन रूग्ण सापडले आहेत. आज १०८जण रोगमुक्त झाले असून एक रूग्ण दगावला आहे.

महापालिका हद्दीत सर्वाधिक २० रुग्णांची भर माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात पडली आहे. प्रत्येकी पाच रूग्ण कळवा आणि वर्तकनगर प्रभाग समिती येथे वाढले आहेत. वागळेमध्ये तीन रूग्ण सापडले आहेत. उथळसर आणि मुंब्रा भागात प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली आहे. प्रत्येकी एक रूग्ण दिवा आणि लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात नोंदवले गेले आहेत. नौपाडा-कोपरी येथे एकही रूग्ण सापडला नाही तर एका रुग्णाच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी १०८जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८९,३०० रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक रूग्ण दगावला असून आत्तापर्यंत २,१३९ जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ४२९ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ४०जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २४ लाख ७४,३२३ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये एक लाख ९२,२०४जण बाधित मिळाले आहेत.