महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार कसे पडले, का पडले, कोणामुळे पडले वगैरे प्रश्नांची उत्तरे माध्यमांच्या मदतीने मिळवली आहेत. जनता आपल्या कामाला लागली आहे आणि राज्यकर्त्यांनीही कामावर रुजू व्हावे ही अपेक्षा आहे. अपयश, अकार्यक्षमता, अनिर्णायकी वगैरे त्रुटीमुळे उद्धव ठाकरे यांच्या सरकारला त्यांच्याच लोकांनी घरी पाठवले. त्या दूर करण्याचे काम नवे सरकार करील ही रास्त अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे यांचे नेमके काय चुकले यावर किमान डझन-दोन डझन प्रबंध लिहिले जाऊ शकतील. पण त्या निष्कर्षातून नवे राज्यकर्ते, विशेषतः श्री. एकनाथ शिंदे हे काही शिकणार आहेत काय हा कळीचा मुद्दा आहे. श्री. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून ‘ऍक्शन मोड’मध्ये गेले आहेत. झोकून देऊन काम करायची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे श्री. ठाकरे यांच्या कार्यशैलीतील ही मर्यादा ते दूर करण्याचा प्रयत्न करून आपण कसे वेगळे आहोत अशी प्रतिमा निर्माण करतील. परंतु श्री. ठाकरे यांच्या पायउतारात आणखी एक महत्वाची बाब जबाबदार होती, ती ते दूर करतील काय, हा खरा प्रश्न आहे. ही बाब प्रशासकीय वा राजकीय नसून पूर्णपणे खासगी आहे. श्री. ठाकरे यांच्या जवळच्या (?) माणसांच्या कोंडाळ्याने त्यांचा घात केला आहे हे उभ्या आणि आडव्या महाराष्ट्राला समजून चुकले आहे. श्री. शिंदे यांना असे कोंडाळे आपल्याला त्रासदायक ठरणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. राजकारणात नेता जसजसा मोठा होऊ लागतो तसतसे हे कोंडाळे वाढत जाते आणि मग कोंडाळ्यातही अतिजवळचा, जवळचा वगैरे वर्गवारी होऊ लागते. इंग्रजीत त्यास ‘कोटेरी’ (coterie) असे म्हणतात. या शब्दाचा अर्थ कंपू असा आहे. त्याला ‘किचन कॅॅबिनेट’ असेही संबोधले जाते. म्हणजे नेत्याच्या घरात, त्याच्या खासगी जीवनात आणि अर्थातच त्याच्या गोपनीय गोष्टी त्यांना सहज उमगत असतात. एकदा का हा ‘अॅक्सेस’ नेत्यानेच या जवळच्या लोकांना दिला की तो त्यांच्यावर दैनंदिन कारभारापासून महत्वाच्या निर्णयात त्यांना सामावून घेऊ लागतो. नेत्याचे खासगी असे काही या मंडळीत रहात नसते आणि तिथेच ही मंडळी शिरजोर होऊ लागतात. अगदी ‘ब्लॅकमेलिंग’ हा शब्द वापरणे योग्य होणार नाही, परंतु अवलंबनात्वाचा गैरफायदा ही जवळची माणसे घेऊ लागतात. त्याला पाहिजे तर ‘इमोशनल बार्गेनिंग’ म्हणता येईल. परंतु ही परिस्थिती नेताच निर्माण करीत असतो. त्याच्या महाअपराधात त्याचा खारीचा वाटा सिंहाचा कधी होतो हे नेत्याला तेव्हाच कळते जेव्हा हा कंपू नेत्याला जनतेपासून अलगद दूर नेऊ लागतो. श्री. शिंदे हे जनतेत मिसळणारे, एकरूप होणारे, रमणारे नेते आहेत. या प्रतिमेचे संवर्धन करायचे झाल्यास त्यांना जवळची माणसे निवडताना काळजी घ्यावी लागणार. या कंपूशाहीची उपयुक्तता उपद्रवात कशी आणि कधी परिवर्तीत होते, याचे चिंतन श्री. शिंदे यांनी करायला हवे. सहसा अशा जवळच्या माणसांमध्ये स्वार्थ हाच अवगुण असतो. ते आपले सर्वस्व नेत्याला देत असल्याचा आभास निर्माण करीत असले तरी ते झूट असते. गेल्या काही वर्षातील यशस्वी नेते प्रसंगी पडद्याआड गेले असले तरी त्यांच्या कंपूतील लोक प्रचंड श्रीमंत होऊन आनंदाचे आयुष्य जगत आहेत. त्यांना नेत्याच्या उत्कर्षांपेक्षा स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यात स्वारस्य असते. श्री. शिंदे यांनी ही बाब लक्षात घेऊन आपले ‘किचन कॅबिनेट’ तयार करायला हवे. तसे ते करतील इतके ते निश्चितच परिपक्व आहेत. गेल्या काही वर्षातील त्यांचा राजकीय प्रवास बारकाईने अभ्यासला तर त्यांची निवड करण्याची प्रक्रिया अधिक प्रगल्भ सातत्याने दिसते. त्यामुळे ‘जवळ’ची माणसे अपायकारक ठरणार नाहीत याची ते सर्वोतोपरी काळजी घेतील हिच अपेक्षा!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूरला विठुरायाच्या पूजेचा मान मिळाला. महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि स्थैर्यासाठी त्यांनी प्रार्थना केली असणार. महाराष्ट्रातील राजकारणाला बडव्यांचे ग्रहण लागल्याची चर्चाही आपण ऐकली. या बडव्यांपासून श्री. शिंदे यांचे रक्षण माऊलीने करावे, अशी प्रार्थना जनतेने केली असेल. असो. श्री. शिंदे यांची खुर्ची काटेरी आहे, पण निदान ‘जवळ’चा कंपू काटेरी ठरू नये हिच आशा.