विचारेंसह पाचजण वगळता सेनेतील १३ खासदार नाराज ?

उद्धव ठाकरेंसोबत सोमवारी खासदारांची बैठक
खा.सदाशिव लोखंडे यांची माहिती

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करत राज्यात सत्तांतर घडवले. आमदारांनंतर शिवसेनेतील खासदारही फुटणार अशा चर्चा रंगल्या आहेत. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यासह पाच खासदार वगळता शिवसेनेचे तब्बल 13 खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहे.
याबाबत सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याशी एका वृत्तवाहिनीने संपर्क साधला. यावेळी लोखंडे यांनी प्रत्येक प्रश्नाला थेट उत्तर देण्याचं टाळलं. पण त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. लोखंडे म्हणाले की, 13 खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या मागच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याची भूमिका मांडली. यावेळी सर्व खासदारांचा सूर असाच होता, ज्यांच्याविरोधात आपण लढलो, ते परिपूर्ण होत आहेत. आपण मात्र कमकुवत झालोय, अशी खंत खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवल्याचं लोखंडे यांनी सांगितले.

शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज शिर्डीत निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित बैठकीला हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु असल्यानं अनेकांच लक्ष या बैठकीकडे लागले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाले असले तरी निळवंडे पाटाच्या कामाला अडचणी येणार नसून हे काम जलदगतीने पूर्ण होईल, असा विश्वास खासदार लोखंडे यांनी यावेळी बोलून दाखवला. राजन विचारे, अरविंद सावंत, संजय मंडलिक, विनायक राऊत, गजानन कीर्तीकर हे खासदार शिंदे गटात जाण्यास अनुत्सुक असल्याचे कळते.

राज्यातील आमदार फूट प्रकरण हा राज्याचा विषय आहे. तो उद्धव ठाकरे आणि आमदारांचा प्रश्न आहे. या संदर्भात मी काय बोलणार? भाजप-शिवसेना म्हणून निवडून आलो ही सर्व खासदारांची भूमिका आधीपासूनच आहे. मागील बैठकीत आपण भाजपसोबत जावं ही 13 खासदारांनी भूमिका मांडली आहे. या संदर्भात सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर बैठकीचे आयोजन केले आहे. त्या बैठकीत आम्ही आमची भूमिका मांडू, असे खासदार लोखंडे म्हणाले.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री असताना त्यांनी अनेक कामात मला मदत केली आहे. त्यामुळे आमचा संपर्क त्यांच्याशी असणारच आहे. ज्यांना पाडून आलो ते परिपूर्ण झाले आणि आम्ही कमजोर झालो, अशी खंतही यावेळी लोखंडे यांनी बोलून दाखवली.