ठाणे : ठाणे महापालिकेने पाणी बिलाची वसुली करण्यासाठी पुन्हा थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे प्रयोजन आखले आहे. एप्रिल ते जून या कालावधीत पाणीपुरवठा विभागाने १२.१२ कोटींची वसुली केली आहे.
मागील वर्षी पाणी पुरवठा विभागाला १५८ कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु या विभागाने १२५.२८ कोटींची वसुली केल्याचे दिसून आले आहे. तर स्मार्ट मीटरवरुन जाणाऱ्या बिलावरुन स्थायी समिती आणि महासभेत देखील वादळ उठले होते. त्यातही झोपडपट्टी भागातील नागरीकांकडून मीटरद्वारे वसुली करु नका असेही लोकप्रतिनिधींनी सांगितले होते. त्यामुळे या भागातून मीटरद्वारे वसुली अद्यापही केली गेली नसल्याचे दिसून आले आहे. यंदा या विभागाला २०० कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने आता मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. तसेच थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडीत करण्यावरही भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
यासाठी आता प्रभाग समितीनिहाय दोन ते तीन पथके गठीत करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत १२.१२ कोटींची वसुली या विभागाने केली असून मागील वर्षी या दिवसापर्यंत १३.२४ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र सव्वा कोटींची वसुली कमी झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान पाणी बिलांचे वाटप झाले असून मीटरद्वारे बिलांचे वाटप देखील जुलै अखेरपासून केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. महापालिका हद्दीत आजच्या घडीला ८१ हजार स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यातील ७१ हजार ग्राहकांना आता जुलै महिन्यात तीन तीन महिन्यांचे बील जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यातही झोपडपट्टी भागात मात्र मीटर प्रमाणो बिल वसुल केले जाणार नसल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.