हद्दीच्या वादात ठाण्याचे खड्डे

ठाणे : आताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही प्राधिकरणाच्या हद्दीत खड्डे पडले तरी ते ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बुजवण्यात यावे, यासाठी ठाणे महापालिकेला देखभाल दुरुस्तीसाठी निधी देखील देण्यात येईल असे आदेश दोन वर्षांपूर्वी दिले होते. मात्र त्यांच्या या आदेशाला हरताळ फासण्याचे काम सध्या ठाणे महापालिकेकडून करण्यात होत आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे त्या-त्या प्राधिकरणाने बुजवावेत असे फर्मानच पालिकेने सोडले आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांचे नंबर देखील सार्वजनिक करण्याचा इशारा ठाणे पालिकेने दिला आहे. सरकारी यंत्रणांच्या या वादात ठाणे शहर मात्र खड्ड्यात जाण्याची वेळ आली आहे.

गेल्या चार पाच दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी ठाणेकरांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे महापालिका हद्दीमध्ये सेवा रस्ते आणि अंतर्गत रस्ते हे ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत येत असून घोडबंदर येथील उड्डाणपूल हे एमएमआरडीएच्या अखत्यारीत येतात. दुसरीकडे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत देखील काही रस्ते येतात. पावसाने जोर पकडल्यापासून सर्वच प्राधिकरणाच्या रस्त्यांवर खड्डे पडले असून यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

शहरात खड्डे पडून एखादा अपघात झाल्यास ठाणे महापालिकेला जबाबदार धरले जाते असा ठाणे पालिका प्रशासनाचा अनुभव आहे. परिणामी आता ठाणे महापालिकेने फतवाच काढला असून यामध्ये ज्या प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर खड्डे पडतील ते त्याच प्राधिकरणाने बुजवावेत तसेच अशा अधिकाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक देखील सार्वजनिक करण्याचा इशारा ठाणे महापालिकेने दिला आहे, मात्र खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले तत्कालीन पालकमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही प्राधिकरणाचे खड्डे असले तरी ते ठाणे महापालिकेने बुजवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र तत्कालीन पालकमंत्र्यांच्या आदेशालाच बगल देऊन खड्डे बुजवण्याचे फर्मान ठाणे पालिकेने काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

खड्डे कोणाचे सर्वसामान्य नागरिकांचा काय संबंध?
रस्त्यांवर पडलेले खड्डे कोणाचे या वादात सरकारी यंत्रणा अडकल्या आहेत. या वादात मात्र खड्डे बुजवण्याच्या कामाला विलंब होत असून सरकारी यंत्रणांच्या या वादामुळे नागरिकांचे मात्र वाहतूक कोंडीने प्रचंड हाल होत आहेत. खड्डे कोणाचे याच्याशी आमचा काय संबंध, आम्हाला सुरक्षित प्रवास करता यावा एवढे तरी खड्डे बुजवा, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.