घोडबंदर रोडवर खड्ड्याचा पहिला बळी

ठाणे : जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडू लागले असून घोडबंदर मार्गाच्या मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर खड्डा चुकवताना दुचाकी पडून चालक पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या एसटी बसखाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास काजूपाडा, घोडबंदर रोड, ठाणेकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर, घोडबंदर रोडवर येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गिकेवरून एक दुचाकीस्वार (एमएच-०४-जी.व्ही.३१७२) ठाण्याकडून मुंबईकडे जात होता. खड्ड्यामध्ये दुचाकी गेल्याने तोल जाऊन हा दुचाकीस्वार दुचाकीवरून रस्त्यात पडला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एसटी बसच्या (एम.एच.१४ बी.टी. २६७३) ठाणेकडून बोरिवलीला जाणारी बस) मागील चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

घोडबंदर मार्गावर आणि सेवा रस्त्यावर खड्डे पडू लागले असून ते चुकवताना वाहनचालकांची चांगलीच कसरत होत आहे. हे खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, अन्यथा अपघातांची मालिका सुरूच राहण्याची भीती व्यक्त होत आहे.