जिल्ह्यात अकरावी प्रवेशापासून कुणीही राहणार नाही वंचित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात अकरावीच्या एकूण एक लाख २८,६९० जागांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात यंदा एक लाख १७,१८३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी एक लाख १३,८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे यंदा विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणापेक्षा कॉलेजमध्ये बैठक क्षमता अधिक आहे.

ठाणे पालिका क्षेत्रात ९७ महाविद्यालयांमध्ये कला शाखेसाठी ४,९४०, वाणिज्य १३,७००, विज्ञान ११,१२० आणि एच.एस.व्ही.सीसाठी ३० जागा अशा एकूण २९,७९० जागा प्रवेशासाठी आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ८४, महाविद्यालयात कला ५,१६०, वाणिज्य १६,०४०, विज्ञान १०,४०० आणि एच.एस.व्ही.सी ३३० अशा ३१ हजार ९३० जागा, उल्हासनगर पालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांमधील ५८ कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेसाठी २,९२०, वाणिज्य १०,३८०, विज्ञान ५,४६० असे १८ हजार ७६० याचबरोबर मिरा-भाईंदर पालिका परिसरातील ३७ महाविद्यालयात कला १४००, वाणिज्य ६,६००,विज्ञान ३५६० असे ११ हजार ५६०, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ६१ महाविद्यालयात कला १४३०, वाणिज्य १०,०५०, विज्ञान ९,३६० एच.एस.व्ही.सी ३०० अशा २१ हजार १४० जागा प्रवेशासाठी आहेत.

भिवंडीत कॉलेजमधील क्षमता वाढविली

यंदा भिवंडी शहर आणि ग्रामीण परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बैठक क्षमता वाढविण्यात आली असून यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे सोपे होणार आहे.

महाविद्यालय व बैठक क्षमता

तालुका कनिष्ठ महाविद्यालय एकूण प्रवेश संख्या क्षमता
ठाणे पालिका ९७ २९,७९०
कल्याण डोंबिवली ८४ ३१,९३०
उल्हासनगर, अंबरनाथ-
बदलापूर नगरपालिका ५८ १८७६०
मीरा-भाईंदर ३७ ११,५६०
नवी मुंबई ६१ २१,१४०
भिवंडी ग्रामीण २९ ४८००
भिवंडी शहर ३४ १०,७१०
एकूण ४०० १,२८,६९०