मुंबई : राज्यपालांनी येत्या रविवार-सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे, तर त्यापाठोपाठ नव्या सरकारची बहुमत चाचणीही पार पडणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजप नेत्यांच्या उपस्थितीत नार्वेकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षात अनेक अनुभवी आणि दिग्गज आमदार असताना नवख्या आमदाराला तिकीट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राहुल नार्वेकर हे याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष बदलून आले आहेत. सेनेत असताना आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
आधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवत भाजपने धक्कातंत्र अवलंबलं होतं. त्यामुळे भाजप हायकमांडने ही नेमकी कुठली खेळी खेळली आहे, याची चर्चा रंगली असतानाच नवीन सरप्राईज समोर आलं. शिंदे गट आणि भाजपने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर आता नवीन सरकारला आपले बहुमत विधानसभेत सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येत आहे.
राहुल नार्वेकर कोण आहेत?
राहुल नार्वेकर हे मुंबईतून भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. नार्वेकर आधी शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष सोडल्याने मोठा भूकंप झाला होता.
राष्ट्रवादीत प्रवेश करताच जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर धरला. आता भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ते विद्यमान आमदार आहेत.
राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते. तर भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 मधून दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत. राहुल यांची वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक 226 मधून नगरसेविका आहेत.