मुंबई : गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज चमत्कारिक शेवट झाला. ऐनवेळी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यासह देशाला अनपेक्षित शपथविधी सोहळा पाहायला मिळाला. मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेत आश्चर्याचा धक्का दिला.
एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनात शिवसैनिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची गोपनियतेची शपथ दिली. राजभवनात हा छोटेखानी शपथविधी सोहळा झाला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी ही शपथ घेतो, अशी सुरुवात करत शिंदे यांनी शपथ घेतली.
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरा आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून सत्तास्थापनेबाबतच्या हालचाली सुरू झाल्या. आज सकाळी शिंदे हे गोव्यातून मुंबईत आले आणि थेट देवेंद्र फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर भेट घेतली. त्यानंतर, तेथून ते राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर आता शिंदे मुख्यमंत्रीपदी आणि फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
शनिवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून यावेळी नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास
1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे. 2004, 2009, 2014, 2019 चार वेळा आमदार; 2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते; 12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्ष नेता, 5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री; तसेच जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते; नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री.
सुपरव्हायझर…रिक्षाचालक ते थेट नगरसेवक
सुरुवातीच्या काळात ते ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला होते. कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडत आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आणि ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले. काम करत असताना एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला दोन व्यक्तिंमुळे कलाटणी मिळाली. त्या व्यक्ती म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाच्या कामाला सुरुवात केली. पक्षाची कामं करताना शिंदेंना आनंद दिघेंचा सहवास लाभला आणि त्यांच्या प्रति विश्वास वाढू लागला. कालांतरानं एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागलं. पक्षाप्रतिची निष्ठा पाहुन एकनाथ खडसेंना त्यांच्या कामाची पावती मिळालीच. 1984 साली वयाच्या विसाव्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यावर आनंद दिघेंनी जबाबदारी सोपवली. ठाण्याच्या किसन नगरचं शाखाप्रमुख पद त्यांना देण्यात आलं. इथूनच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
ठाण्यात जल्लोष
जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर ठाण्यात शिंदे समर्थक शिवसैनिकांनी भर पावसात एकच जल्लोष केला. फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरवून ढोल-ताशांच्या तालावर नाचून आनंद व्यक्त केला.
मागील काही दिवस तणावाखाली असलेल्या ठाणेकरांनी या नियुक्तीमुळे आनंद साजरा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राजीनामा दिला. त्यानंतर सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला होता. दुपारी गोवा येथून श्री. शिंदे हे मुंबईत आले. त्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. फडणवीस यांनी शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असे जाहीर करताच ठाण्यात एकच जल्लोष सुरू झाला. शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी येथील निवासस्थानासमोर आणि टेम्भी नाका येथील आनंद मठ येथे ढोल-ताशांच्या गजरात शिवसेनेचे कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते. एकमेकांना पेढे भरवत होते. यावेळी सुमारे २० ते ५०हजाराच्या फटाक्यांच्या माळांची आतिषबाजी करण्यात आली होती.
ठाण्याला पहिल्यांदाच श्री. शिंदे यांच्या रूपाने सर्वसामान्य नागरिकांना समजून घेणाऱ्या नेत्याची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. यामुळे ठाण्याचा विकास आणखी जलद गतीने होईल, असे यावेळी शिवसैनिकांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.