ठाणे : जवळपास गेला महिनाभर ठाणे वाहतूक पोलीस विभागाला पूर्णवेळ दर्जाचा उपायुक्त मिळत नसल्यामुळे तूर्तास ठाणे पोलीस मुख्यालयातील दत्ता कांबळे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.
उपायुक्तपदी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त केला नसल्याने नव्या अधिका-यांचा आदेश न काढता कांबळे यांना तात्पुरता पदभार घेण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पूर्णवेळ उपायुक्त त्वरीत नियुक्त न केल्याने गेल्या २० दिवसांपासून ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था सकाळपासून ते रात्रीपर्यंत कोलमडलेली असते.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत ठाणे ते बदलापूर, भिवंडी शहराचे काही क्षेत्र आणि काही ग्रामीण पट्ट्याचाही भाग येतो. आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी हमखास होणारच, असे असूनही वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक, निरीक्षक आणि पोलिसांवर येणार आहे. काही वाहतूक पोलीस अन्य कामी गुंतले असल्यामुळे ‘ट्रॅफिक वॉर्डन’वर वाहतुकीचे नियमन करण्याची वेळ येते. मात्र अनेक वाहन चालक त्यांना न जुमानता त्यांची वाहने दामटतात, असे प्रकार ठाण्यातील ब-याच ठिकाणी आढळून आले आहेत.
विशेषत: कॅसल मिलपासून ते तलाव पाळी रोड ते स्टेशन रोड, कळवा खाडी पूल या रस्त्यांवर उभी करुन ठेवलेली चार चाकी वाहने, भाज्यांची लहान-मोठी वाहने, नौपाड्यातील रिक्षा चालकांची वाकडी-तिकडी वाहतूक यामुळे रोजच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
तारांकित आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी नेहमीच हमरस्त्याने जातात. ते शहरांतील अंतर्गत रस्त्याने कधीच प्रवास करत नसल्यामुळे त्यांना सामान्य वाहन चालकांची व्यथा कशी कळणार असा सवाल तीन पेट्रोल पंप ते एसटी आगार, राम मारुती रोड, नौपाडा, नौपाडा ते हरी निवास, कोपरी कॉलनी येथील वाहन चालकांनी, रहिवाशांनी केला आहे.
कोपरी कॉलनीतील ढासळलेल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांचे एकही वाहन कधीही फिरकलेले नाही, अशी माहिती अनेक स्थानिक रहिवाशांनी दिली.
ठाणे शहरातीलच नव्हे डोंबिवली, कल्याण आदी शहरांतील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि ठाणे शहरांतील व इतर शहरांत सुरु असलेल्या विविध प्रकल्पासंबंधीची कामे वेगाने करुन घेणे, अन्य शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत वारंवार संपर्क ठेवणे आदी जबाबदा-या वाहतूक पोलीस उपायुक्तांना पार पाडाव्या लागतात. काही प्रसंगी त्यांच्या सहयोगी अधिका-यांना व पोलीस कर्मचा-यांना त्याची पूर्तता करावी लागते, असे एका वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिका-याने सांगितले.