ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये ताणाताणी
ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे समर्थक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक यांच्यात ठिणगी पडत असून शिवसेना शाखेच्या ताब्यावरून आगामी काळात मोठा संघर्ष पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटणार नाही.
एकनाथ शिंदे समर्थक गट विरोधात शिवसेना असा संघर्ष संपूर्ण राज्यात रंगला असताना शिवसेना शाखांवर वर्चस्व कुणाचे असा नवा वाद उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. याची पहिली ठिणगी ठाणे शहरातील कळवा परिसरात पडली आहे. ज्या शिवसेना शाखेचे उदघाटन स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते अशा कळवा नाक्यावरील शिवसेना शाखेवर शिंदे समर्थकांचा बॅनर लावण्यावरून शिंदे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. माजी उपमहापौर गणेश साळवी यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी शाखेवर बॅनर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र कळव्यातील विभागप्रमुख विजय शिंदे यांनी विरोध केला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच राहावे अशी इच्छा कळव्यातील शिवसैनिकांची आहे. तसेच अजूनही या राजकीय परिस्थितीवर अद्याप निर्णय झाला नसल्याने बॅनर लावण्यास विरोध केला असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाल्याचे वृत्त असून याबाबत मात्र कुठेच चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा वाद फारसा समोर आला नसला तरी, भविष्यात हा संघर्ष अधिक तापण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांपूर्वी चंदनवाडी शाखेवर उद्धव ठाकरे यांना समर्थन देणारे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. या होर्डिंगला काळे फासण्यात आल्याने काही काळ तणाव पसरला होता. पोलिसांनी तेथे बंदोबस्त दिल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.
एकूणच शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीचे पडसाद आता सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये उमटत असून गेली अनेक वर्षे सामाजिक आणि राजकीय कार्याची केंद्रे ठरलेल्या शिवसेना शाखांवर अधिकार कोणाचा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तर दोन्ही समर्थक शाखांवर वर्चस्व मिळवण्यासाठी पुढील काळात आक्रमक झाले तर आश्चर्य वाटणार नाही.