सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे दोन गट झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशामध्येच राजकीय क्षेत्रामधील नावाजलेलं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड राजकारणामधील बहुचर्चित व्यक्तीमत्त्व आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी वेगाने सुरु असताना जितेंद्र यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘शाहू छत्रपती’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय कोल्हापूरमध्ये या चित्रपटाच्या शीर्षक अनावरणाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला जितेंद्र आव्हाड यांनी देखील हजेरी लावली होती.
जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पोवाडा ऐकायला मिळत आहे. “एक स्वप्न साकार होत आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करून सिनेमाच्या रुपात घेऊन येत आहोत लोकराजाची कथा ‘शाहू छत्रपती’. सहा भाषांमध्ये भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर २०२३मध्ये प्रदर्शित होईल.” असं जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड प्रस्तुत या चित्रपटामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेले लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांचं जीवनकार्य प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिली आहे. तसेच दिग्दर्शन वरुण सुखराजने केलं आहे. विद्रोह फिल्म्स निर्मित हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.