शिंदे गटाचे पुन्हा शक्तिप्रदर्शन; खा. राऊतविरोधात आंदोलन

आनंदाश्रमाला पोलिस छावणीचे रूप

ठाणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संताप व्यक्त करत आज ठाण्यात एकनाथ शिंदे समर्थकांनी टेम्भी नाका येथे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी आनंदाश्रमाला पोलीस छावणीचे रूप आले होते.

शिंदे गटाच्या ४० आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठींबा काढल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून ठाकरे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. त्यातच आसाममधील बंडखोर आमदारांच्या जीवंत बॉड्या राज्यात परत येतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी काल पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केले होते. त्याचे कालपासून ठाण्यात पडसाद उमटत असून राऊत यांचा पुतळाही जाळण्यात आला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे, शाखाप्रमुख बबन मोरे यांनी आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम कार्यालयात सर्वांना जमा होण्याचे आवाहन केले होते. याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी आनंद आश्रमाकडे धाव घेतली, त्यामुळे येथे पोलीस छावणीचे रुप आले होते.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शेकडोच्या संख्येने समर्थक येथे जमा झाले होते. त्यांनी श्री.शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली त्यानंतर सर्व समर्थक धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी गेले. तेथे त्यांनी खऱ्या शिवसेनेला ताकद देण्याची प्रार्थना केली. संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना दिलासा दिल्यानंतर शिंदे समर्थकांनी फटाके फोडून त्याचे स्वागत केले.

श्रीकांत शिंदे यांचा पुन्हा हल्लाबोल

आमचीच खरी शिवसेना असून लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. संजय राऊत यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने बॉड्या परत येतील असे ते बोलत असल्याचे डॉ. शिंदे यांवेळी म्हणाले. आपला संताप व्यक्त करताना ते आमदार कुणाचे वडील, कुणाचे पती, कुणााचे काका आहेत, याचे भान ठेवायला हवे असे बोलून त्यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.