ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी नवी मुंबई आणि ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाल्याने अभिनेत्री केतकी चितळे आज ठाणे कारागृहातून बाहेर आली आहे.
अभिनेत्री केतकी चितळेवर ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात तिला न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली होती. दरम्यान केतकीने कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर बुधवारी ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला 20 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळेवर अट्रोसिटीचा गुन्हा रबाळे पोलीस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यात तिला ठाणे सत्र न्यायालयाने यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. दोन्ही गुन्ह्यात जामीन मिळाल्याने केतकीची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी केतकी हसतमुख बाहेर पडली. यावेळी तिचे वकील योगेश देशपांडे सोबत होते. अजूनही न्याय मिळायचा बाकी आहे,अशी प्रतिक्रिया केतकीने कारागृहातून बाहेर पडतांना दिली. मी आत कारागृहात पदवीच्या मुलांना शिकवत होती. खूप छान वाटत होते. त्यांना शिक्षकांची गरज आहे, असे देखील केतकीने सांगितले.