लेटलतिफांना आयुक्तांचा दणका; हजेरी पुस्तकात लावली गैरहजेरी

‘ठाणेवैभव’ इम्पॅक्ट

भाईंदर: ‘ठाणेवैभव’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रभाग कार्यालय क्र. ४ मध्ये सकाळी १०-१५ वाजताच भेट दिली. कार्यालयीन अधिक्षकासह सुमारे १५ हून अधिक कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या हजेरी पुस्तकात शेरा लिहून गैरहजरी  लावली.

२८ ऑक्टोंबर२०२१ मध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयातील लेटलतिफांना आळा घालण्यासाठी ‘फेस डिटेक्शन मशीन’द्वारे दैनंदिन कर्मचारी व अधिकारी उपस्थिती नोंदवून त्यानुसार दरमहा वेतन देण्याबाबत शासनाच्या सामान्य प्रशासनातर्फे परिपत्रक जारी करण्यात आले. मात्र मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाच्या ‘अति-गतिमान’ कारभारामुळे पालिका मुख्यालयासह इतर प्रभाग कार्यालयात फक्त १७ फेस डिटेक्शन यंत्रे बसविण्यात आल्याचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत यांनी सांगितले. उर्वरित ठिकाणी यंत्रे न बसविल्याने आस्थापना विभागाने जुनीच  हजेरी पुस्तक नोंदीनुसार वेतन परंपरा कायम ठेवली आहे.

पालिका प्रशासनालाच ‘कामचुकार’ कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची इच्छा असल्याने फेस डिटेक्शन मशीनद्वारे नोंदणीनुसार वेतन देण्यास सुरुवात होत नसल्याने पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उशिरा कामावर येणे व लवकर घरी जाण्याची परंपरा कायम ठेवली. आज (गुरुवार) सकाळी १०-१५ वाजता आयुक्त दिलीप ढोले यांनी सचिव महेश भोसले यांच्यासह प्रभाग कार्यालयास भेट दिली. अर्धा तास कार्यालयात हजर असलेल्या आयुक्तांना सुमारे १५ हून अधिक कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याचे आढळून आल्याने हजेरी पुस्तकात नोंद केली. लेटलतिफांविरोधात आयुक्त ढोले कोणती कारवाई करतात? याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.