स्टेशन परिसरातून फेरीवाल्यांना हटवले; रेल्वे प्रवाशांची वाट मोकळी

ठाणे : ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटवले असून पादचारी आणि रेल्वे प्रवाशांचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे रेल्वे स्टेशन येथे फेरीवाल्यांमुळे रेल्वे प्रवासी, नागरिक व येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो. ह्याच कारणामुळे पादचारी व रेल्वे प्रवाशांना कामाला किंवा कॉलेजला जायला उशीर होतो. त्याचप्रमाणे जे नागरिक रेल्वेने प्रवास करता, त्यांची गाडी चुकते आणि लेटमार्क लागतो. ह्याच त्रासामुळे रेल्वे प्रवासी संघटना व नागरिकांनी आयुक्तांकडे फेरीवाले मुक्त ठाण्याची मागणी केली होती.

पादचारी व रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार अतिक्रमण विभागाने स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटवले आणि गेले चार-पाच दिवसांपासून एकही फेरीवाला स्टेशन परिसरात दिसला नाही. हे बघून सर्व पादचारी व रेल्वे प्रवासी ह्यांना दिलासा मिळाला. या बाबत उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेने आयुक्तांचे आभार मानले असून ही कारवाई नियमित व्हावी अशी मागणी संघटनेने केली आहे.