अंबरनाथ-बदलापूरची आरक्षण सोडत जाहीर
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आज सोमवारी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीत दोन्ही शहरांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दिग्गजांना धक्का बसला आहे. दोन्ही शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे प्रभाग आरक्षीत झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता पर्यायी प्रभागांचा शोध घ्यावा लागणार आहे. भाजप पदाधिकाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून त्यांचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत.
आज सोमवारी दोन्ही नगरपालिकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांचे आरक्षण सोडत पार पडली. बदलापूर नगरपालिकेच्या आरक्षण सोडतीसाठी कात्रप येथील पालिकेच्या सभागृहात विविध पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.
बदलापूर शहरातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रभागांची घोषणा करण्यात आली. यात प्रभाग क्रमांक ९, १२, १०,२२, १७, २३ आणि ६ या प्रभागांचा समावेश होता. यातील चार जागांसाठी सोडत काढली असता प्रभाग क्रमांक ९, १२, २२ आणि ६ हे प्रभाग अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित झाले. तर अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक एक आणि दोन आरक्षित झाले. यात सोडतीनंतर प्रभाग क्रमांक दोन हा अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झाला.
अंबरनाथमध्ये ५९ प्रभागांतून ३० प्रभाग महिलांसाठी राखीव
अंबरनाथमध्ये ५९ प्रभागांत व्दिसदस्य पॅनल पद्धतीने निवडणूक होणार आहे. फक्त एका प्रभागात तीन सदस्य निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक १, ४, ७, ८, ९, १४, १७, १९ हे आरक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी सोडत काढली असता त्यात प्रभाग क्रमांक ७, १४, १७ आणि १९ हे चार प्रभाग आरक्षित झाले. तर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक २८ आणि २९ पैकी २९ हा प्रभाग अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित झाला.
शहरात २०११ सालच्या जनगणनेनुसार असलेल्या पावणे तीन लाख लोकसंख्येच्या प्रमाणात ५९ प्रभाग निश्चित करण्यात आले असून व्दिसदस्य पॅनल पद्धतीने निवडणूक होणार आहे. फक्त प्रभाग चार खामकर वाडी, शिवलिंगनगरमध्ये त्रिसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण या धोरणानुसार ५९ सदस्य असलेल्या नगरपालिकेत महिलांचे संख्याबळ ३० राहणार आहे.
ओबीसी आरक्षण नसल्यामुळे केवळ लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण सोडत निश्चित करण्यात आले. आठ ठिकाणी अनुसूचित जातीचे तर दोन ठिकाणी अनुसूचित जमातीचे आरक्षण टाकण्यात आले आहेत. आठ आरक्षणापैकी प्रभाग क्रमांक १९ आंबेडकरनगर परिसर, प्रभाग क्रमांक १४ ऑर्डनन्स- गांधीनगर परिसर, प्रभाग क्रमांक १७ नवरेनगर परिसर आणि प्रभाग क्रमांक ७ भास्करनगर परिसर या चार ठिकाणी अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. तर उर्वरित चार प्रभाग हे अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आले. त्यात प्रभाग -१ जावसई-फुले, प्रभाग ४ खामकरवाडी, प्रभाग ८ घाडगेनगर, प्रभाग ९ मेटल नगर- खुंटवली वरचा पाडा या प्रभागाचा समावेश आहे. तर अनुसूचित जमातीसाठी दोन प्रभाग निवडण्यात आले असून त्यात प्रभाग २८ आणि प्रभाग २९ यांचा समावेश आहे. त्याच प्रभाग क्रमांक २९ पाले गाव आणि परिसर हा प्रभाग अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे, तर प्रभाग क्रमांक २८ अंबरनाथ गाव, प्रकाश नगर-बारकुपाडा परिसर हा भाग अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. उर्वरित सर्व प्रभागामध्ये एक महिला आणि एक सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले.