तिसऱ्या पुलाची लटकंती; दुसऱ्या पुलाची नाहक कोंडी

आणखी दीड महिना वाहतूक कोंडी 

ठाणे : ठाणे आणि कळव्याला जोडणारा तिसरा पूल नागरिकांना खुला करण्याची तारीख पुन्हा पुढे गेली आहे. आता जुलैअखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून दुसऱ्या खाडी पुलावर होणाऱ्या वाहनांच्या कोंडीचा त्रास ठाणेकरांसह कळवेकरांना आणखी दीड महिना नाहक सहन करावा लागणार आहे.

ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा नाक्यावर असलेल्या ब्रिटीशकालीन पुलाची वाहतूक क्षमता संपुष्टात आल्याने हा पुल काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद होता. या पुलाच्या बाजूलाच पालिकेने दुसरा पुल १९९५ साली उभारला होता. परंतु ब्रिटिशकालीन जुना पुल बंद करण्यात आल्याने दुसऱ्या  पुलावर वाहतुकीचा भार वाढून वाहतुक कोंडी होत होती. त्यामुळे कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाचे काम स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत २०१४ मध्ये सुरु करण्यात आले होते. या पुलासाठी १८३ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा एकमार्गी पुल असणार आहे. तर विटाव्याकडून ठाण्याकडे येणाऱ्यांसाठी जुन्या पुलाचा पर्याय ठेवण्यात आला आहे. ठाण्याकडून खारीगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे ठाणे-बेलापूर दिशेला अशा दोनही मार्गाने हा पुल खाली उतरणार आहे. कळव्याकडून ठाण्याकडे येताना हा पुल साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाकामार्गे ठाणे स्टेशनकडे खाली उतरणार आहे. केबल स्टेड टाईपचा हा पुल असून तो दिड किमीचा आहे. मागील आठ वर्षे या पुलाचे काम सुरू आहे.

डिसेंबर २०२१ साली हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता, परंतु कोरोनामुळे या पुलाच्या कामाचा वेग मंदावला होता. डिसेंबरमध्ये या पुलाची एक मार्गिका खुली केली जाईल, असा दावा देखील करण्यात आला होता. परंतु आता या कामाने वेग घेतला आहे. या कामात अडथळा ठरणाऱ्या ११९ हायटेन्शन स्टील वायरचे स्ट्रेसींगचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार येत्या जुलै अखेरपर्यंत साकेत आणि पोलीस आयुक्त कार्यालय अशा दोन मार्गिका सुरु करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे.

या पुलाचे काम युद्धपातळीवर व्हावे यासाठी त्रिसदस्यीय समिती या कामावर देखरेख ठेवणार आहे, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. जून महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे या पुलाच्या कामाची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी सांगितले होते, परंतु पुन्हा त्याची डेडलाईन पुढे गेली आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला करून कळवेकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्रिसदस्यीय कमिटी या कामावर देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी आणि कार्यकारी अभियंता धनंजय मोदे यांची टीम गठीत करण्यात आली आहे.