कळवा, खारीगाव, विटावा, दिवा, माजिवडे भागात प्रशासनाचे दुर्लक्ष
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशाला प्रभाग स्तरावर केराची टोपली दाखवण्याचे धारिष्ट्य सध्या पाहायला मिळत असून कळवा, माजिवडे प्रभागात अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे उघडकीस आले आहे.
ठाण्यात सर्वाधिक बेकायदा बांधकामे कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत होत आहेत. सहायक आयुक्तांच्या निदर्शनास या बाबी तक्रारदारांकडून आणून देण्यात येत असल्या तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून या बांधकामांकडे पाहावे लागत असल्याचा अजब खुलासा त्यांच्याकडून होत आहे. मग झोपड्या आणि टपऱ्यांवर अशी माणुसकी का दाखवली जात नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. खारीगावमध्ये जाम फॅक्टरीजवळ अनधिकृतपणे बहूमजली इमारत उभी राहिल्यानंतर याच इमारतीला लागून दोन मजली इमारत उभी राहिली. ही बांधकामे तेथे राहणाऱ्या रहिवाशांनी गरजेपोटी बांधली असून त्याकडे आम्हाला मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहावे लागते असे उत्तर तक्रारदारास देण्यात आले. विटावा मार्गावर प्रियांका पॅराडाईज इमारतीजवळ, पऱ्याचे मैदान, सुर्यापाडा, विसर्जन घाट येथील बेकायदा इमारतींबाबतही प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. त्याचवेळी या सर्व बांधकामांवर कारवाई केली असल्याचे उत्तर देण्यासही संबंधित अधिकारी विसरले नाहीत. प्रत्यक्षात ही बांधकामे मात्र विना कारवाई सुस्थितीत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
माजिवड्यात धोकादायक पद्धतीने होत असलेल्या इमारतीबाबत स्थानिक रहिवाशाने अनेकवेळा कळवूनही सहायक आयुक्त कारवाईबाबत चालढकल करत असल्याचे उघडकीस आले आहे. दिवा प्रभागात तर प्रशासनच नसल्याचे सर्रास सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवरून स्पष्ट होत आहे. तक्रारदारांवर दबाव टाकून बेकायदा इमारतींना पाठीशी घातले जात असल्याचा स्पष्ट आरोप या आधीच आमदार संजय केळकर यांनी केला आहे. केवळ लहान-सहान खोल्यांवर आणि शेडवर कारवाई करून शहरात प्रशासन जागरूक असल्याचा देखावा निर्माण केला जात असल्याचा आरोप जागरूक नागरिक करत आहेत. आयुक्तांनी प्रशासक म्हणून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे.