दहावीत जाणाऱ्या मुलींचा टक्का घसरला

ठाणे : आरटीई कायद्यानुसार कोणत्याच विद्यार्थ्यांना ८ वी पर्यंत नापास करता येत नसल्यामुळे ९वी मध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार हे प्रमाण घसरते. परिणामी गेल्या तीन वर्षात ९वी मधून दहावीत जाणाऱ्या मुलींचा टक्का घसरत असल्याचे पुढे येत आहे.

कुटुंबाचे होणारे स्थलांतर, मुलींना मिळणारी दुय्यम वागणूक, सामाजिक रूढी परंपरा, बालविवाह, शाळा घरापासून दूर असणे, मुलींची असुरक्षितता, घरची आर्थिक परिस्थिती, कोरोनामुळे शिक्षणात पडलेला खंड यामुळेही दहावीमध्ये मुलींची शैक्षणिक गुणवत्ता घसरलेली दिसून येते. ठाणे जिल्ह्यातील ९वी मधून दहावीमध्ये जाणाऱ्या मुलींच्या पटसंख्येत दोन वर्षांच्या तुलनेत गतवर्षात कमी असली तरी ही गळतीची संख्या चिंताजनक आहे.

गेल्या तीन वर्षात १८ हजाराहून अधिक मुलीं पुन्हा शाळेत जाऊ शकल्या नसल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. त्यामुळे कोरोना काळात मोठ्या प्रमाणात मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडल्याचे वास्तव समोर आले आहे. नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये मुलींच्या गुणवत्तेची आकडेवारी नक्कीच सुखावणारी आहे. मात्र अनेक उपक्रम-योजना राबवूनही प्रगतशील महाराष्ट्रात मुलींची गळती अजूनही कायम आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढावी म्हणून प्रयत्न केले जात असतानाच, दुसरीकडे नववीमधून दहावीत जाणाऱ्या मुलींची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. डिजिटल वर्ग, बोलक्या भिंती, संगणक कक्ष, स्वच्छतागृह अशा वेगवेगळ्या उपाययोजना करून शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी विना अनुदानित, अनुदानित शाळांमध्ये मुलीं उच्च शिक्षणापर्यंत पोहचत नसल्याचे ग्रामीण परिसरातील चित्र आहे.
विद्यार्थी भत्ता, सायकल योजना, सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षण हक्क कायदा, माध्यान भोजन अशा विविध योजना शाळांमध्ये राबविल्या जात आहेत. या माध्यमातून ग्रामीण परिसरातील मुली शिक्षण अर्धवट सोडू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यात शिक्षण विभागाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.

तीन वर्षांची गोळाबेरीज

ठाणे जिल्ह्यात २०१९ मध्ये ९ वीमध्ये ६४,४५० मुली होत्या. मात्र दहावीमध्ये ही संख्या घटून ५८,१३९ वर पोहचली. तर २०२० मध्ये ९ वी मध्ये ६६ हजार ०१८ मुली शिक्षण घेत होत्या. मात्र दहावीमध्ये ५८ हजार २८९ मुली शिक्षणासाठी पुढे आल्या. २०२१ मध्ये ही संख्या ६६ हजार ५९६ वरून ६१, ७८४ वर आली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये मुलींच्या गळतीचे प्रमाण १८ हजार ८४२ पोहचले आहे.

मुलींची पटसंख्या
साल ९ वी १० वी गळती
२०१९ ६४,४५० ५८,१३९ ६,३११
२०२० ६६,०१८ ५८,२८९ ७,७२९
२०२१ ६६,५९६ ६१,७९४ ४,८०२
एकूण गळती १८,८४२