राज्यसभा निवडणुकांत तिसरी जागा जिंकून देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारल्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतराचे वारे वाहू लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. येत्या काही दिवसांत विधान परिषदेच्या बहुचर्चित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत आणि त्यातही भाजपाने कमाल केली तर हवेतल्या चर्चेला दिशा मिळू शकेल. राजकारणात असे उतार-चढाव नित्याचेच असतात. त्यातून निष्कर्षही काढले जात असतात, परंतु प्रत्यक्षात ते खरे ठरतातच असे नाही. अर्थात अनपेक्षित निकालामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे आणि त्याचे पडसाद विधान परिषदेच्या निवडणुकीत उमटले तर आश्चर्य वाटता कामा नये.
भाजपामध्ये या विजयामुळे नवचैतन्य पसरले आहे. महाविकास आघाडीला मिळेल त्या मुद्यावर सळो की पळो करून सोडणाऱ्या भाजपाला सत्ता खुणावू लागली असेलही. राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी गणित पक्के असावे लागते. फडणवीस यांच्या कुशाग्र बुद्धीमतेमुळे तिसरी जागा खेचून आणली. भाजपा समर्थक नागरिक त्यामुळे भारावून जाणे स्वाभाविक आहेत. परंतु याच क्षणी विधानसभेची जर मध्यावधी निवडणूक लागली तर मतदारांना आपल्याकडे वळवण्यात भाजपा यशस्वी होईल काय? काही अपक्ष आमदारांचा कौल मिळवणे हा एक भाग झाला. परंतु जे मतदार कुंपणावर आहेत (पाहिजे तर निःपक्ष म्हणा ) त्यांना आपल्याकडे वळवण्याची ताकद भाजपाकडे आहे काय हा खरा प्रश्न आहे. फडणवीस हिरो जरूर ठरले. परंतु त्यांना मुख्यमंत्री करण्याची जनतेची मानसिकता झाली आहे काय? राज्यसभेचे गणित आणि जनतेच्या दरबारात त्यांचा कौल भाजपाला मिळेल काय? एक आक्रमक विरोधी पक्ष म्हणून भाजपा सातत्याने जनतेच्या नजरेत रहात आहे. त्यात त्यांना यशही मिळत आहे. जनतेलाही सत्तारुदढ पक्षाबद्दल राग यावा असे त्यांना मनोमन वाटतं आहे, परंतु निव्वळ आक्रमकपणाने ही मतपरिवर्तनाची प्रक्रिया घडू शकते काय? फडणवीस यांना सत्तापालट झाला तर निर्विवादपणे मुख्यमंत्रीपदाचा चेहेरा म्हणून स्वीकारले जाऊ शकते. परंतु मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहण्यासाठी आक्रमकपणाबरोबर सरकारच्या चुकलेल्या धोरणांना आणि योजनांना पर्यायही देण्याचे काम भाजपाला करावे लागेल. सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीने काहीही केलेले नाही असे भाजपाला वाटत असेल तर आम्ही काय केले असते हे त्यांनी जनतेला सांगायला हवे. त्यांना पटवून द्यायला हवे. आक्रमकपणा सत्ताकांक्षेचे यान उडवण्यापूर्वी जे छोटे रॉकेट उडवले जाते तसे आहे. सत्तेच्या अवकाशात फिरण्यासाठी यानात मोहीम फत्ते होण्यासाठी पुरेसे इंधन लागते. तसेच मार्गक्रमण करण्यासाठी एक सूत्रबद्ध संरचनाही लागते. भाजपाची सध्या पूर्ण ताकद यान उडवण्यात वापरली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दोन प्रतिमा जनतेसमोर आहेत. एक अत्यंत चाणाक्ष असा विरोधी पक्षनेता आणि दुसरी अभ्यासू आणि कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून. त्यापैकी पहिल्या प्रतिमेतून यथावकाश त्यांना बाहेर पडावे लागेल. त्यांच्या व्यक्तिमत्वाला मुख्यमंत्री पदाबरोबर येणारे गुणवैशिष्ट्य चिकटले आहेत. सातत्याने ते आक्रमक पवित्र्यात राहिले तर जनतेला मानवणारे नाही. त्यामुळे भाजपातील दुसऱ्या फळीतील ज्येष्ठ नेत्यांकडे फडणवीस यांनी आयुधे सुपूर्द करणे शहाणपणाचे ठरेल. सत्तारुढ पक्षावर उठसूट आसूड ओढण्याचे काम त्यांनी सहकाऱ्यांना सोपवायला हवे. त्याबाबतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा.
महाविकास आघाडीनेही चुकलेल्या गणिताचा आढावा घ्यायला हवा. भाजपाला जसा आक्रमकपणा नडू शकतो तसा महाविकास आघाडीचा फाजील आत्मविश्वास त्रासदायक ठरू लागला आहे. भाजपात जशा नुपूर शर्मा आहेत तसे महाविकास आघाडीतही बेजबाबदार वक्तव्य करणारे नेते आहेत. तोंडाला लगाम देण्याचा धडा राज्यसभा निवडणुकीने त्यांना दिला आहे. भाजपाने बाजी मारल्यामुळे उसळून जाण्याची स्वाभाविक प्रतिक्रिया भाजपचा सत्तेचा मार्ग सुकर करू शकते. महाविकास आघाडीने सत्तेला लागणारा संयम आणि प्रगल्भता दाखवली तर त्यांना असे अपघात भविष्यात टाळता येतील. भाजपाने महाविकास आघाडीतील कच्चे दुवे शोधून बाजी मारली हे मात्र नक्की. महाराष्ट्रातील जनता राज्यातील राजकारणाच्या ओव्हर डोसला कंटाळली आहे, हे लक्षात घेण्याची वेळ आली आहे.