दिव्यात निधीचा स्रोत आटला; रिमॉडेलिंग प्रकल्प रखडला

* फक्त ४० टक्के काम पूर्ण
* ठेकेदाराचे ८० कोटी थकले

ठाणे : दिवा आणि मुंब्रा भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी रिमॉडलिंग प्रकल्पाचे गेल्या तीन वर्षात केवळ ४० टक्केच काम पूर्ण झाले असून विशेष म्हणजे हे काम करणाऱ्या ठेकेदाराचेही तब्बल ८० कोटींचे बिल थकले असल्याने या कामालाच ब्रेक लागण्याची शक्यता आहे. या समस्येसह दिव्याच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची भेट घेतली.

ठाणे महापालिकेने मुंब्य्रातील पाणी वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. त्यानंतर यामध्ये दिव्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार 2010-11 मध्ये यासाठी 97.41 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. सुरुवातीला केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत हे काम करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु या योजनेसाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. तसेच ही योजना देखील बंद झाली. त्यामुळे ही योजना कशी राबवयाची असा पेच पालिकेपुढे पडला होता. त्यानंतर केंद्राच्या अमृत योजनेतून पालिकेने हे काम करण्याचा पालिकेने विचार केला होता. परंतु अमृत योजनेतून देखील या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. अखेर पालिकेने आता या योजनेसाठी स्वत: खर्च करण्याची तयारी दर्शवली. सध्या मुंब्रा आणि दिव्याची लोकसंख्या ही वाढली असून येथे असलेले जलकुंभ हे 2011 पर्यंत पाणीपुरवठा होईल एवढेच होते. परंतु आता त्यात वाढ करणे अपेक्षित आहे.

दिव्याची पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी तब्बल २१२ कोटींचा रिमॉडलिंगचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. पाणी पुरवठय़ाचे नियोजन हे पायाभूत वर्ष २०१९ धरुन पुढील ३० वर्षासाठी वहन व्यवस्था व वितरण व्यवस्था गृहीत धरण्यात येणार आहे. जलकुंभ संप व पंप हाऊस 15 वर्ष कालावधीसाठी संकल्पीत करण्यात येतील, या योजनेसाठी महापालिकेची स्वत:ची योजना व एमआयडीसीकडून पाणी उपलब्ध करुन देणार आहे, मुंब्रा दिवा विभागासाठी मुख्य जल संतुलन टाकी बांधण्याचा समावेश करण्यात येणार आहे, नव्याने 200 मी.मी. ते 1 हजार मी. मी. व्यासाच्या सुमारे 18 किमी लांबीच्या जलवाहीनी टाकण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत नव्याने 10 जलकुंभ बांधले जाणार असून आदी कामांसह इतर कामांचा यात समावेश करण्यात आला आहे.२०१९ पासून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून केवळ ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा काम पूर्ण करण्याचा कालावधी संपला असून यासाठी ठेकेदाराला केवळ १५ कोटीच बिलापोटी अदा करण्यात आले आहेत. जवळपास ८० कोटी रुपये अजूनही थकले असल्याने या प्रकल्पाच्या कामालाच आता ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत.

दिव्याच्या विविध विकास कामांसाठी आमदार प्रमोद पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची भेट घेऊन निधीची मागणी केली आहे. खिडकाळी स्मशानभूमी ते उत्तरशीवपर्यंत रस्ता तयार करणे, तसेच दिवा रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करून हा परिसर मोकळा करणे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मात्र या कामासाठी निधीच नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले असल्याचे पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.