नालासोपा-याला जाणा-या बसफे-यांमध्येही कपात
ठाणे : ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलावरुन शहराच्या विविध भागांमध्ये जाणा-या ठाणे परिवहन विभागाने (टीएमटी) दररोज १४० अतिरिक्त फे-या सुरु केल्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत राबता असलेल्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र टीएमटीला दरदिवशी फक्त एक-दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने आवक-जावकाच्या ‘गणिता’चा मेळ अद्याप जमलेला नाही.
ठाण्यातील शाळांच्या सुट्ट्या संपल्यानंतर या आवकीत नक्कीच आणखी भार पडेल, असा दावा टीएमटीच्या वरिष्ठ अधिका-यांनी केला. या बस रोज सोडल्या जात असल्यामुळे प्रवाशांसाठी मोठी सोय झाल्याने ‘डेक’वर दिवसभर प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे. काही वेळेस ही गर्दी वाढत असल्याने प्रवाशांना ताटकळत राहावे लागले तरी ते बसची वाट पाहात असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. यामुळे बसमध्ये भरगच्च प्रवासी आढळतात. काही मार्गांवरील फे-या वाढवण्याची मागणीही प्रवाशांकडून वाहकांकडे बरेचदा होते.
ठाणे पालिकेची परिहवन सेवा सर्वोत्तम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरीता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील प्रवासी मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले होते.
घोडबंदर परिसरात वाढत्या गृहसंकुलांचा अभ्यास करुन, त्यानुसार प्रवासी वाहतूक आणि बसगाड्यांच्या फे-या याचा अ•यास टीएमटीने केला आणि ब्रम्हांड, उपवन (गावंड बाग), लोकमान्य नगर, पवार नगर, ओवळा, धर्माचा पाडा, बोरिवडे गाव, वाघबिळ, घोडबंदर रोड मार्गावर सेवा सुरु केली. टीएमटी व्यवस्थापनाने सकाळी आणि सायंकाळी काही फे-या नालासोपारापर्यंत सुरु केल्या, परंतू, त्यातून आर्थिक फायदा मिळण्याऐवजी तोटा होत असल्याने १० फेऱ्यांऐवजी सध्या चार फे-या चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यालादेखील फारसा प्रतिसाद नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
टीएमटीपेक्षा जास्त एसटी तिकीटाचा ‘टप्पा’ पाच किमीचा
टीएमटी सेवेचे कमीतकमी तिकीट ठाण्यात दोन किलोमीटर अंतरापर्यंतच चालते. मात्र एस.टी सेवेचे कमीतकमी तिकीट पाच किलोमीटरच्या टप्प्यापर्यंत वापरले जाते. टीएमटीचा हा टप्पा वाढवल्यास आणखीन प्रवासी या सेवेकडे आकर्षित होतील, असेही सूत्रांनी सांगितले.
सॅटिस पुलावरुन सोमवारी सोडण्यात येणा-या बससेवेला प्रवाशांचा जास्त प्रतिसाद असतो. त्यानुसार, गेल्या सोमवारी २३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले मात्र बुधवारी, ८ जून रोजी २२ लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, असेही एका अधिका-याने दिली. येथून सुटणारी प्रत्येक बस दिवसभरातील वेळेनुसार आणि अंतरानुसार सुमारे ४०० ते ६०० प्रवासी ने-आण करते, अशी माहिती सूत्रांनी दिली.