ठाणे : दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर ठाणे महापालिका नालेसफाई करते. मात्र ही नालेसफाई योग्य पद्धतीने केली जात नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना पूरजन्य परिस्थितीचा सामना करावा लागतो.
यंदा आयुक्तांनी अनेक ठिकाणी नालेसफाईची पाहणी केली. पण ठाण्यातल्या पोखरण रोड, गांधीनगर, कापूरबावडी, मानपाडा, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट, महात्मा फुले नगर, लोकमान्य नगर या ठिकाणची नालेसफाई अद्याप अपूर्ण स्थितीमध्ये आहे. आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या दौऱ्यात काही ठिकाणची पुन्हा नालेसफाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची अमंलबजावणी न करता आयुक्तांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू होण्याआधी नालेसफाई पूर्ण करण्याी मागणी स्थानिक नागरिक तसेच मनसेचे जनहित विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.
ठाणे शहरात गेल्या महिनाभरापासून ठिकठिकाणची नालेसफाई केली जात आहे. अनेक ठिकाणी नालेसफाई करून काढलेला गाळ पुन्हा नाल्याच्या बाजूलाच टाकल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी नाले पूर्ण साफ केले गेले नाहीत. ६ जून रोजी आयुक्तांनी केलेल्या नाले सफाईच्या पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांना काही नाल्यांची सफाई पुन्हा करण्याचे निर्देश दिले होते. पण याकडे कानाडोळा करत अधिकारी आयुक्तांच्याच आदेशाची पायमल्ली करत असल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे.
रस्त्यांच्या कामांबरोबरच आता नालेसफाईमध्येही भ्रष्टाचार होत असून नालेसफाई करणारे ठेकेदार हे नालेसफाईन करता केवळ दिखावा करत आहेत.