खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : कबड्डीत महाराष्ट्राच्या मुलींचे रूपेरी यश

हरियाणातील पंचकुला येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये आज कबड्डीच्या मैदानावर महाराष्ट्राच्या मुलींनी रौप्य पदकाची कमाई केली. सुवर्णपदकासाठी हरियाणाशी झालेली लढत त्यांना जिंकता नाही. महाराष्ट्राच्या संघाचा हरियाणाकडून (४८-२९) १९ गुणांनी पराभव झाला. याशिवाय, मुलांच्या कबड्डी संघानेही कास्य पदकाची कमाई केली आहे.

पंचकुला येथील ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्राच्या मुलींच्या संघांदरम्या कबड्डीचा अंतिम सामना झाला. हरियाणाची खेळाडू पूजा हिने केलेल्या चढायांमुळे महाराष्ट्राचा संघ संकटात आला. एक दोन अपवाद वगळता महाराष्ट्राच्या मुलींना अंतिम सामन्यात फार प्रभाव दाखवता आला नाही.

सामन्यातील पहिल्या चढाईतील पहिला बोनस पॉईंट हरियाणाच्या नावे नोंदवला गेला. त्यानंतर महाराष्ट्रानेही पहिल्या चढाईत गुण मिळवला होता. पहिल्या टाईम आउटच्यावेळी दोन्ही संघाचा गुणतक्ता बरोबरीत होता. त्यानंतर मात्र, हरियाणाच्या पूजाने जबरदस्त खेळ करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली.

सामन्याचा पहिल्या हापमध्ये महाराष्ट्राचे सर्व खेळाडू बाद झाले. परिणामी हरियाणाला (१८-१२) सहा गुणांची आघाडी मिळाली. महाराष्ट्राच्या हरजीत, यशिका आणि मनिषा यांनी बोनस गुण घेतले. परंतु, तरीही महाराष्ट्राला आघाडी घेता आली नाही. दुसऱ्या हापमधील टाईम आऊटच्या वेळी हरियाणाचे ३३ गुण होते तर महाराष्ट्राचा संघ १९ गुणावर होता.

सामना संपण्यासाठी सात मिनिटे शिल्लक असताना महाराष्ट्राचा संघ पुन्हा एका सर्वबाद झाला. त्यामुळे हरियाणाला २१ गुणांची भरभक्कम आघाडी मिळाली. शेवटी महाराष्ट्राचा १९ गुणांनी पराभव झाला. अंतिम सामन्यात विजय मिळाल्यामुळे मुलींच्या कबड्डीचे सुवर्णपदक हरियाणाला मिळाले तर रौप्य पदक महाराष्ट्राच्या वाट्याला आले.

हिमाचल प्रदेशच्या मुलांच्या संघाने कबड्डी स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले तर हरियाणाला रौप्य व महाराष्ट्राला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. याशिवाय, महाराष्ट्राला आज कुस्तीमध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कास्य पदके मिळाली.