रायलादेवीच्या निमित्ताने…

कोणत्याही महापालिका नागरिकांकडून मिळणाऱ्या कराच्या मोबदल्यात सर्वसाधारणपणे दोन प्रकारच्या सुविधा देत असतात. एक असते दैनंदिन देखभालीबाबतची सुविधा आणि दुसरी लोकहिताच्या मोठ्या वास्तूंचे बांधकाम. नाट्यगृहे, शाळा, दवाखाने, पूल, आदींचा यात समावेश होत असतो. दैनंदिन कामांबाबत महापालिका प्रशासकीय दृष्टिकोनातून कर्तव्य पार पाडत असते, परंतु ज्या वास्तू वा प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च होणार असतात आणि त्यांचा दूरगामी परिणाम नागरिकांच्या जीवनावर होत असतो त्या प्रकल्पांत नागरिकांचे मत का अजमावले जात नाही, असा सवाल आम्ही अनेकदा उपस्थित केला आहे. ठाण्याच्या रायलादेवी तलाव सुशोभीकरणानिमित्त आमचा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुमारे 50 कोटी रुपये खर्च करून जो रायलादेवी सुशोभित होणार आहे त्यावर आतापर्यंत किती वेळ खर्च झाला आणि या तलावाची आजची दुरावस्था पहाता तो अक्षरश: पाण्यात गेला असे म्हटले तर वावगे ठरू नये. तो पैसा खर्च झाला तो नागरिकांचाच होता. प्रशासन त्याचे उत्तर देणार आहे का? कशावरून आता नव्याने खर्च होणारे 50 कोटी वाया जाणार नाहीत, असा सवाल आहे. याबाबत बातम्या प्रसिद्ध होत असताना संबंधित अधिकारी पत्रकारांशी बोलत नसतील तर संशयाचे ढग गडद होत जातात, एरवी अत्यंत किरकोळ प्रश्नावर भरभरुन प्रतिक्रिया देणारे अधिकारी आता मूग गिळून गप्प का?
रायलादेवीच्या सुशोभीकरणाला विरोध असायचे कारण नाही. वागळे इस्टेट भागातील या तलावाच्या विकासामुळे या परिसरातील नागरिकांची गर्दी मासुंदा वा उपवन तलावाकडे जाणे बंद होईल. अशा विकेंद्रीकरणाची संधी 60 तलावांमुळे मिळाली असती. परंतु त्यापैकी अनेक गायब झाले. महापालिकेेकडे त्याचेही उत्तर नाही.
उथळसर भागातील जोगिला तलावाचे काम का रखडले आहे का सवालही या निमित्ताने विचारला जाऊ शकतो. त्यावर होणाऱ्या खर्चासाठी पैसे नसतील तर मग रायलादेवीच्या कामाचे नियोजन काय हाही सवाल आहे.
ठाण्यात शेकडो तज्ज्ञमंडळी रहातात. कोणी उत्तम अभियंते आहेत तर कोणी वास्तुविशारद. जगाच्या पाठीवर तलावांचे सुशोभीकरण आणि संवर्धन कसे चालते हे जाणणारेही अनेक असतील. अशा नागरिकांना महापालिकेने कोट्यवधी रुपयांची कामे ठेकेदाराला देताना विचारायला हवे. सल्लामसलत झाली तर नवीन कल्पना पुढे येऊ शकतात. दोन पैसेही वाचू शकतात. परंतु महापालिका चालणाऱ्या आपणच जणू राजे आहोत असे वाटत असते आणि अशा या मक्तेदारीमुळे पाण्यापासून परिवहन सेवेपर्यंत आणि रस्त्यांपासून मोकळ्या मैदानांपर्यंतच्या नागरी सुविधांची पुरती वाट लागली आहे. रायलादेवी तलावाची योजना नागरिकांसमोर मांडणे उचित ठरेल.