ठाण्यात कोरोनाच्या घोडदौडीला चाचणी केंद्रे घालणार वेसण

* घोडबंदर-वर्तकनगरमध्ये कोरोनाची सर्वाधिक रुग्णवाढ

* ठाण्यात पाच नवीन चाचणी केंद्रे

ठाणे: ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असून घोडबंदर आणि वर्तकनगर भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी शहरात पाच नवीन चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व उपायुक्तांसह सहाय्यक आयुक्तांची सोमवारी बैठक घेतली. कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत आयुक्त शर्मा यांनी कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्याबरोबरच महत्वाच्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास या कोविड रुग्णालयात सर्व तयारी ठेवणे, औषधसाठा, साफसफाई, लसीकरण याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबरोबरच आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सुचना त्यांनी केल्या आहेत. तसेच रेल्वेस्टेशन, बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

या आदेशानंतर महापालिकेच्या आऱोग्य विभागाने मंगळवारी शहरातील रुग्ण संख्येचा आढावा घेऊन पाच ठिकाणी नवीन करोना चाचणी केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील ३० आरोग्य केंद्रे आणि कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना चाचणी केंद्रे सुरु आहेत. या व्यतिरिक्त आणखी पाच नवीन करोना चाचणी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. पातलीपाडा उड्डाणपुल, कॅडबरी नाका उड्डाणपुल, ठाणे रेल्वे स्थानक, सॅटीस पुल आणि जिल्हा रुग्णालय परिसरात उभारली जाणार आहेत. घोडबंदर आणि वर्तकनगर भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून तेथील रुग्णांना परिसराच्या जवळच चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पातलीपाडा आणि कॅडबरी नाका उड्डाण पुलाखाली  दोन ठिकाणी चाचणी केंद्रे उभारली जाणार आहेत. तसेच, ठाणे स्थानक परिसर हे गर्दीचे ठिकाण असल्यामुळे याठिकाणी दोन केंद्रे उभारणी जाणार आहेत. याशिवाय, जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातही एक केंद्रांची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांनी दिली. ही सर्व केंद्रे आजपासून सुरु होणार आहेत.  या नवीन केंद्रांसह पालिकेच्या एकूण ३६ केंद्रांवर ६० टक्के आरटीपीसीआर तर ४० टक्के शीघ्र प्रतिजन चाचण्या करण्यात येणार आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवालात अचूक निदान होते. त्यामुळे आयुक्त शर्मा यांच्या सुचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. खासगी दवाखाने आणि रुग्णालयात येणाऱ्या ताप आणि सर्दीच्या रुग्णांची करोना चाचणी करण्याच्या सुचना संबंधित डाॅक्टरांना दिल्या आहेत.

मंगळवार ७ जूनची रुग्णवाढ : 
प्रभाग समिती : दिवा-३, कळवा-३, लोकमान्य-सावरकर-८, माजिवडे-मानपाडा-५५, मुंब्रा-२, नौपाडा-कोपरी-५, उथळसर – १२, वर्तकनगर-२३, वागळे इस्टेट-१०, इतर-१
एकूण-१२२