अनधिकृत होंर्डिग्ज, बॅनर्सविरोधात तक्रारींसाठी टोल फ्री सुविधा सुरू

ठाणे महापालिकेचे नागरिकांना आवाहन

ठाणे : शहरांमध्ये लावण्यात येत असलेले अनधिकृत होर्डिंग्ज, जाहिरात फलक, पोस्टर्स, फ्लेक्सेस, बॅनर्स, आर्चेस (कमानी) बाबत मौखिक व एसएमएसद्वारे नागरिकांना तक्रारी करण्याकरिता महापालिकांनी टोल फ्री क्रमांक व भ्रमणध्वनी सुविधा सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायलयाने जनहित याचिकेच्या अन्वये दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने टोल फ्री क्रमांक 1800-222-108, भ्रमणध्वनी क्रमांक 7506946155 व ट्विटर सुविधा सुरु केली असल्याचे अतिक्रमण नियंत्रण व‍ निष्कासन विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग्ज, जाहिरात फलक, फ्लेक्सेस, बॅनर्स, आर्चेस (कमानी) आदींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून आल्यास नागरिकांनी त्या संदर्भातील तक्रारी टोल फ्री क्रमांक 1800-222-108, भ्रमणध्वनी क्रमांक 7506946155 व ट्विटर सुविधेद्वारे तक्रारी करुन ठाणे शहर अनधिकृत होर्डिंग्ज, जाहिरात फलक, पोस्टर्स, फ्लेक्सेस, बॅनर्स, आर्चेसमुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या होर्डिंग्ज, जाहिरात फलक, फ्लेक्सेस, बॅनर्स, आर्चेसवर ठाणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येऊन संबंधितांवर द महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1995 नुसार गुन्हे दाखल करण्यात येतील असेही अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभाग ठाणे महानगरपालिका यांनी नमूद केले आहे.