ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १४ जून आणि शर्मिला राज ठाकरे यांच्या ८ जून या दोन्ही वाढदिवसाचे औचित्य साधुन ठाणे मनसेतर्फे सप्ताहभर विविध मनोरंजनात्मक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला म्हणजेच १३ जून रोजी ठाण्यात हनुमान चालिसाचे वाटप आणि पठणाचे कार्यक्रम होणार आहेत.
मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तमाम महाराष्ट्र सैनिकांकडून आपल्या दैवताला अनोख्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. जुन महिन्याच्या ८ तारखेला शर्मिला ठाकरे तर १४ जुन रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. याच वाढदिवसानिमित्त राज्यभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सप्ताहरुपी विविध कार्यक्रमाचे आयोजन शहराच्या विविध भागात करण्यात आले आहे.
८ जून रोजी महिला आरोग्य शिबीर आणि पाककला स्पर्धा, ९ जून रोजी जेष्ठ नागरिक कलागौरव, १० जून रोजी ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस, ११ जून रोजी भजन स्पर्धा, १२ जून रोजी रोजगार मेळावा, १३ जून रोजी हनुमान चालिसा पठण आणि वाटप आणि १४ जून रोजी महाआरती आणि प्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार आहेत.