गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षीत असलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.६७ टक्के लागला असल्याची माहिती जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.
कोरोनामुळे मागील वर्षी बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली गेली. ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आज या परीक्षेचा निकाल लागला असून, बारावीच्या परीक्षेला यंदा ठाणे जिल्ह्यातील ९५ हजार ४२० बसले होते. त्यापैकी ८८ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकालात मुलींची बाजी
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही ठाणे जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९३.७५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील ४४ हजार ९४३ मुलींना बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ४२ हजार १३५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेला बसलेल्या ५० हजार ४७७ मुलांपैकी ४६ हजार २९६ मुले परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यंदा उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९१.७१ टक्के आहे.
जिल्ह्याचा निकाल – ९२.६७ टक्के
परीक्षेला बसलेले विद्यार्थी -९५ हजार ४२०
उत्तीर्ण विद्यार्थी – ८८ हजार ४३१
उत्तीर्ण मुले – ४४ हजार ९४३
उत्तीर्ण मुले – ४६ हजार २९६
मुलींचा निकाल – ९३.७५ टक्के
मुलांचा निकाल – ९१.७१ टक्के