डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पुन्हा उभारी घेण्यासाठी कंबर कसली असून कडोंमपात महापौर बसविण्याचा निश्चय केला आहे. कल्याण-डोंबिबलीत मनसेने सदस्य मोहीम सुरू करून डोंबिवलीकर नागरिकांना मनसेचे सदस्य होण्याचे आवाहन केले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत 2010 साली मनसेचे 29 नगरसेवक होत, पण 2015 च्या निवडणुकीत फक्त नऊ नगरसेवक पालिकेत राहिले. मात्र आता होणाऱ्या पालिका निवडणुकीत संपुर्ण चित्रच पालटले आहे. मनसेच्या काही दमदार माजी नगरसेवकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. आता पूर्वीच्या युती-आघाडीतही मोडतोड झाली आहे. राज्यात महाआघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्रित असून स्थानिक स्वराज्य संस्थेतही महाआघाडी होण्याचे संकेत आहेत. याचाच फायदा मनसेला घ्यावा लागेल. भविष्यात भाजपा आणि मनसे हे पक्ष एकत्र आले तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होऊन पुन्हा मनसेला कडोंमपामध्ये आपले वर्चस्व राखता येईल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मनसेने कल्याण-डोंबिवलीकरांना पुन्हा साद घातली आहे.
याबाबत मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले की, अगदी काही दिवसातच मनसेची सदस्य नोंदणी सुरू होईल. निवडणुकीत पुन्हा तेच उमेदवार निवडून देऊन शहराचे वाटोळे करू नका. गेली 25 वर्षात पालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार, नियोजनशून्य कारभार, अनधिकृत बांधकाम, कचरा समस्या, पाणीप्रश्न, रस्ते, पथदिवे, सिग्नल यंत्रणा, अनधिकृत फेरीवाले, आदी अनेक समस्यांतून कायमचे मुक्त होऊन स्वच्छ, सुंदर व सुनियोजित कल्याण-डोंबिवलीसाठी सज्ज व्हा आणि मनसेत सामिल व्हा, असे आवाहन घरत यांनी केले आहे.
राज्यातील महाआघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. पुन्हा पालिकेत त्या नगरसेवकांना थारा देऊ नका. जनतेचा विश्वासघात करून जे सत्तेत बसले आहेत त्यांच्याबद्दल विश्वास राहिला नाही. महाविकास आघाडीला सत्तेवरून पायउतार करायचे असेल तर भाजपा-मनसेने एकत्र यायला हवे. मात्र याबाबत वरिष्ठांचा निर्णय अंतिम राहणार आहे, असेही घरत म्हणाले.