ठाणे : माझी वसुंधरा अभियान 2022 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या या स्पर्धेत “अमृत” गटामध्ये विभागस्तरावर कोकण विभागात अत्युत्कृष्ट कामगिरीकरिता ठाणे महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे यांनी हा पुरस्कार स्विकारला. पर्यावरणदिनी आज टाटा थिएटर, एन.सी.पी.ए., नरीमन पाईट, मुंबई येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यास अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप आयुक्त मारुती खोडके, प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, उप नगर अभियंता विनोद पवार, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, सेवाभावी संस्था प्रतिनिधी भटू सावंत उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाद्वारे आयोजित माझी वसुंधरा अभियानात ठाणे महानगरपालिका सहभागी होती. गतवर्षी म्हणजे सन 2021 मध्ये स्पर्धेच्या प्रथम वर्षात अमृत शहराच्या गटामध्ये ठाणे महानगरपालिकेस प्रथम पारितोषीक प्राप्त झाले होते. सदर अभियान राज्य शासनाद्वारे प्रतीवर्षी राबविण्यात येत असून ठाणे महानगरपालिका सदर अभियानात सातत्याने सहभागी होत असून यावर्षी “अमृत” गटामध्ये विभागस्तरावर कोकण विभागात अत्युत्कृष्ट कामगिरीकरिता ठाणे महापालिकेस सन्मानित करण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदर अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पाणी पुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर विकास विभाग, शिक्षण विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग व इतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी मेहनत घेतली होती. सर्व माहिती संकलन करुन शासनाच्या पोर्टलवर सादर करण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण विभागाने यशस्वीपणे सांभाळली. ठाणे महापालिकेस प्राप्त झालेल्या या सन्मानामुळे महापालिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.