ठाण्याला धोक्याची घंटा

शहरात कोरोनाचे नवीन रुग्ण शंभरावर

ठाणे : गेल्या आठवड्याभरात ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे. ठाणे शहरात दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रथमच नवीन रुग्णांचा आकडा शंभरच्या वर गेल्याने चिंता वाढली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ठाणे शहरात दररोज नवीन रुग्णांची संख्या १०च्या आत आढळून येत होती. मात्र गेल्या आठवड्यापासून नवीन रुग्णांची संख्या हळूहळू वेग घेऊ लागली होती. रविवारी मात्र प्रथमच नवीन रुग्णसंख्या १११ एवढी आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात सध्या ३३४ रुग्ण घरी आणि रुग्णालयात उपचार घेत आहेत. हा वेग असाच कायम राहिला तर तिसरी लाट येण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात नवीन २९ रुग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबई ९७, उल्हासनगर तीन, भिवंडी एक, मीरा-भाईंदर २० तर ग्रामीण जिल्ह्यात १२ रुग्ण आढळून आले आहेत.

दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य शासनाने निर्बंध सैल केले आहेत. त्यामुळे नागरिक मास्क न वापरता सर्वत्र फिरत होते. सॅनिटायजर , सुरक्षित सामाजिक अंतर आदीबाबत काळजी घेत नव्हते. त्यामुळे रुग्णवाढ वेगाने होऊ लागल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती केली आहे. नागरिक नियम पाळत नसतील, हा वेग असाच कायम राहिला तर पूर्वीसारखे निर्बंध लादण्यात येणार असल्याचे संकेत राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.