मनसेची अयोध्या वारी

अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतले रामलल्लाचे दर्शन

ठाणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा प्रकृतीच्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आला असला तरी नियोजनाप्रमाणे ठाण्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तेथील भाजप खासदाराचा विरोध डावलून ४ जूनला अयोध्या गाठत रामलल्लाचे दर्शन घेतले. रविवारी परतलेल्या या मंडळींचे मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले.

मनसेने ज्वलंत हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर राज्यभर विशेषतः ठाणे, मुंबई, कल्याण , पुणे आदी शहरांत कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलनाला धार आणली. या आंदोलनात ठाण्यातील मनसे नेते पोलिसांच्या रडारवर होते. अशाही परिस्थितीत मनसेच्या आंदोलनाला अपेक्षित यश मिळाले.

दरम्यान राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्या दौरा जाहीर केला होता. मनसे कार्यकर्त्यांसाठी रेल्वेचे आरक्षणही करण्यात आले होते. मात्र राज ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला. ठाणे-पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव हे राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ४ जूनला सहकाऱ्यांसह अयोध्येला विमानाने रवाना झाले.अयोध्येत त्यांनी शरयू नदीत स्नान करून रामलल्लाचे दर्शन घेतले.

मनसेने अयोध्येचा दौरा जाहीर केल्यानंतर तेथील भाजप खासदाराने अयोध्येत येण्यास विरोध करत खुले आव्हान दिले होते. मात्र ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यामुळे मुंबई विमानतळावर आणि ठाण्यात त्यांचे रात्री उशिरा जोरदार स्वागत करण्यात आले.