ठाणे : मनसेने रविवारी गांधीगीरी करीत ठाणेकरांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सैनिकांनी घोडबंदर परिसरातील तुंबलेल्या गटारांची, नाल्यांची सफाई केली.
दोनच दिवसापूर्वी मनसेने शहरातील नाले तीन दिवसात साफ न झाल्यास कचरा महापालिकेत टाकण्याचा इशारा दिला होता. परंतु, त्याआधीच मनसेने घेतलेल्या या पवित्र्यामुळे घोडबंदर येथील नागरिक मात्र चांगलेच सुखावले आहेत. स्थानिकांनी वेळोवेळी महापालिकेला आणि लोकप्रतिनिधींना गटारे आणि नालेसफाई करा अशी मागणी केली होती, याकडे कानाडोळा केल्याने स्वतः शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आपल्या मनसैनिकांसह या परिसरातील तुंबलेल्या गटारांची सफाई केली.
ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी नालेसफाई ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी, शहरातील अनेक नाले अद्याप तुंबलेलेच आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मनसेने आक्रमक होत गुरुवारी नाल्यात उतरून आंदोलन छेडले होते. तीन दिवसात नालेसफाई न झाल्यास कचरा पालिका मुख्यालयात आणून टाकण्याचा इशारा दिला होता. ही मुदत संपण्यापुर्वीच रविवारी मनसेने घोडबंदर रोड परिसरातील तुंबलेल्या नाले व गटारांची स्वतः सफाई केली. यावेळी घोडबंदर येथील डोंगरीपाडा, पातलीपाडा नाला, फुफाणे चाळ, ओम साई रहिवासी संघ, किंगकाँग नगर येथील गटारे आणि नाल्यातील गाळ व कचरा उपसून सफाई केली. मनसेच्या या गांधीगिरीची शहरभर चर्चा रंगली आहे.