आमदार संजय केळकर यांची मागणी
ठाणे : ठाणे शहरातील पोलीस वसाहतींच्या इमारतींची परिस्थिती गंभीर झाली आहे. तातडीने त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी शासनाकडे केली. आमदार संजय केळकर यांनी आज नवीन पोलीस वसाहत क्र. १ ते ६ तसेच इमारत ए, बी, सी या इमारतींची पाहणी करून पोलीस कुटुंबियांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, माजी नगरसेवक संतोष साळवी आदी उपस्थित होते.
वर्षानुवर्षे इमारतींची दुरुस्ती केली नाही, छतावर पत्रे टाकले नाहीत, त्यामुळे भिंती, सज्जे यांची परिस्थिती नाजूक असल्याचे निदर्शनास आले . स्ट्रक्चरल ऑडिट त्रयस्थ संस्थेमार्फत पुन्हा करण्याची गरज असून रहिवाशांच्या मागणीप्रमाणे त्वरित दुरुस्ती करून रहिवाशांना त्याच ठिकाणी राहायला मिळेल, अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, असे संजय केळकर यांनी सांगितले.
सातत्याने निधीची मागणी करूनही तो मिळत नसल्याने पोलीस वसाहतीतील शेकडो कुटुंबांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. यास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचा पुनरुच्चार श्री.केळकर यांनी केला. मागील फडणवीस सरकारच्या काळात आमदार संजय केळकर यांनी दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी मंजूर करवून दुरुस्ती करून घेतली होती.