दहा एमएलडी पाण्यासाठी वागळेत जलशुद्धीकरण केंद्र

ठाणे : मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला अतिरिक्त १० एमएलडी पाणी मिळणार आहे. हे पाणी अशुद्ध असल्याने ते शुद्ध आणि पिण्यायोग्य करण्यासाठी ठाणे महापालिकेला साडेसहा कोटी खर्चून जलशुद्धीकरण केंद्र उभारावे लागणार आहे. वागळे पट्ट्यात याकरिता जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या कोट्यातून अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई महापालिकेकडून ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा मंजूर झाला आहे. मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीद्वारे हा पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मुंबई महापालिकेलाही यासंदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेनेही मुंबई महापालिकेकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. मात्र हे पाणी प्रक्रिया न केलेले असल्याने या पाण्याचा वापर करणे अशक्य झाले होते.

तानसा धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून पाणी मिळत असल्याने अशा प्रकारची अडचण आली नव्हती. मात्र अतिरिक्त पाणी वैतरणा धरणातून मिळणार असल्याने प्रक्रिया न केलेले पाणी मिळणार आहे. पावसाळ्यात तर अधिक दूषित पाणी येण्याची शक्यता पालिका प्रशासनाच्या वतीने वर्तववण्यात आली होती.
\ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार स्त्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या अतिरिक्त १० एमएलडी पाण्यासाठी ठाणे पालिकेला १ कोटी ७० लाख रुपयांची अनामत रक्कम मुंबई महापालिकेकडे जमा करावी लागणार असून तशी प्रक्रीया पालिकेने सुरु केली आहे. या पाण्याचे वितरण प्रामुख्याने वागळे इस्टेट परिसरात करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. परंतु प्रक्रियाविनाच मिळणारे पाणी थेट नागरिकांना देणे योग्य नसून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने आता वागळे इस्टेट परिसरात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला असून त्यासाठी जागेचा शोध सुरु केला आहे. जय भवानीनगर परिसरात एका जागेची पाहाणी करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

अंबिकानगरमध्ये जलशुद्धीकरण केंद्र

मुंबई महापालिकेमार्फत ठाणे शहरात दररोज ६५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा आणि वैतरणा धरणातील जलवाहिन्या ठाणे शहरातून जातात. यातील वैतरणा जलवाहिन्यांद्वारे मुंबई महापालिका ठाणे शहरातील करवालोनगर, अंबिकानगर, वर्तकनगर म्हाडा, बाळकुम, काजुपाडा आणि नळपाडा या परिसरांमध्ये दररोज १६ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करते. या जलवाहिन्यांमधून शुद्धीकरण प्रकियेविनाच पाण्याचा पुरवठा केला जातो. यामुळे पावसाळ्यात या परिसरांमध्ये गढुळ पाण्याचा पुरवठा होतो. यामुळे महापालिकेला नागरिकांच्या टिकेला सामोरे जावे लागते. यानंतर पालिकेने मुंबई महापालिकेच्या शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या वाहीनीवरून जोडणी करून काही ठिकाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरु केला आहे. अंबिकानगर परिसरात मात्र अद्यापही प्रक्रीयेविनाच पाणी दिले जात आहे. त्यामुळे याठिकाणी ३ कोटी १० लाख रुपये खर्चुन साडे तीन दशलक्षलीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळू शकते, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.