निर्बंध नको असतील तर…

कोविड टास्क फोर्स बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या जनतेला सूचना

मुंबई : निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्कचा वापर करा, लसीकरण करुन घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मात्र तूर्तास पुन्हा मास्कसक्ती करण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज (गुरुवारी) सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर कोविड टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र मास्कसक्तीचा निर्णय न झाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन महिन्यात करोना रुग्णसंख्या जेमेतम १०० चा टप्पा पार करत होती. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेच्या निश्वास टाकला होता. मात्र मंगळवारच्या दिवसात शहरात पाचशेहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली. वाढते पर्यटन, इतर देशांमध्ये वाढणारी करोना रुग्णसंख्या आणि तिथून येणारे पर्यटक, कोविड चाचण्यांचे कमी झालेले प्रमाण, तसेच विषाणूच्या बदलत्या स्वरुपात करोनाचा फैलाव पुन्हा होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.