ठामपाचे एकाच दिवशी ९४ अधिकारी-कर्मचारी निवृत्त
ठाणे: ठाणे महापालिकेतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रशासकीय यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण असताना दुसरीकडे ३१ मे रोजी एकाच दिवशी महापालिकेच्या सेवेतून तब्बल ९४ अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त झाले आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या या सेवानिवृत्तीमुळे आस्थापनावरील खर्च काही प्रमाणात कमी झाला असला तरी, पालिकेच्या सेवेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण मात्र आणखी वाढणार आहे.
ठाणे महापालिकेचा आकृती बंध काही महिन्यांपूर्वी मंजुर झाला आहे. यामध्ये ८८० पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या पदांची भरती प्रक्रिया अद्यापही पालिकेला सुरु करता आलेली नाही. पालिकेच्या आस्थापना विभागाचा खर्च हा ३९ टक्के असल्याने ही भरती प्रक्रिया ठाणे महापालिकेला राबवता आलेली नाही. त्यामुळे आस्थापना खर्च कमी करण्यासाठी आता पालिकेत प्रयत्न सुरु झाले आहेत. हा खर्च ३० टक्क्यांवर आणण्यासाठी आस्थापना विभागाचा प्रयत्न आहे. गेल्या दोन वर्षात निवृत्त होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे यांची कसर भरुन काढण्यासाठी कंत्राटी स्वरुपात कर्मचारी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र तरी देखील पालिकेच्या महत्वाच्या पदांवर असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची कसर यामुळे भरुन निघताना दिसत नाही. त्यामुळेच पालिकेच्या एका एका अधिकाऱ्यावर पाच ते सात विभागांचा कार्यभार असल्याचे दिसत आहे. आकृतीबंध मंजुर झाला असला तरी तो पूर्ण मंजुर झालेला नाही. तो देखील अर्धवट स्वरूपातच आहे. जून महिन्यात आणखी ५० जण निवृत्त होणार आहेत. दरमहिना अशा पध्दतीने पालिका रिती होत राहणार असल्याचे चित्र आहे. ३१ मे रोजी सेवा निवृत्त झालेल्यांमध्ये कार्यालयीन अधिक्षक ५, वरीष्ठ लिपीक २, लिपीक ३, तांडेल ३, फायरमन, लिडींग फायरमन, स्टाफ नर्स, प्रसाविका, कनिष्ठ प्रयोग शाळा तंत्रज्ञ, अटेंडट, वायरमन, वाहनचालक, मुकादम, जमादार, फिल्ड वर्कर, शिपाई, बिगारी, आया, मजुर, सफाई कामगार, मुख्याध्यापक ६, उपशिक्षक १४ आदींचा समावेश आहे. त्यामुळे आता या पदांची कसर कशी भरुन काढायची असा पेच पालिकेपुढे निर्माण झाला आहे.