ठाणे : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीसाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून या काळात तात्पुरत्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे महापालिकेच्या ९३ शाळा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
पावसामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना स्थलांतरित करून या शाळांमध्ये ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या शाळांमध्ये सर्वप्रकारच्या सुविधा देखील निर्माण करण्यात आल्या असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने पावसाळ्याच्या पूर्वी करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या उपाय योजना जवळपास पूर्ण करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने नालेसफाईच्या कामांना वेळेआधीच सुरुवात करण्यात आली असली तरी ठाणे पालिकेची ही नालेसफाई सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दुसरीकडे शहरातील धोकादायक इमारती देखील रिकाम्या करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जास्त पाऊस पडल्यास शहरात पाणी साचण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात पडझड देखील होत असते. विशेष करून डोंगर पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक धोका असल्याने अशा नागरिकांचे स्थलांतर वेळेत होणे आवश्यक असल्याने यासाठी आतापासून तात्पुरत्या निवाऱ्याची सोय पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्या ९३ शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात येणार असून ज्या शाळा निवडण्यात आल्या आहेत त्याची यादीच पालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या सर्व शाळा सुस्थितीमध्ये आहेत कि नाही ? याची पाहणी देखील अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. यामध्ये पाण्याची सोय, शाळांमध्ये रंगरंगोटी करण्यात आली आहे का नाही,तसेच अत्यावश्यक सेवांचा आढावा देखील घेण्यात आला असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या शाळांमध्ये स्थलांतरित नागरिकांच्या निवाऱ्याची सोय करण्यात येणार आहे त्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक समन्वयाची महत्वाची भूमिका बजावणार आहेत. पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या संकल्पनेतून अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले असून सर्व मुख्याध्यापकांचे मोबाईल नंबरची यादी देखील तयार करण्यात आली आहे. याशिवाय वर्गखोल्यांच्या चाव्या देखील मुख्याध्यापक,शिक्षण विभाग आणि मुख्यालय अशा तीन ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.