ठाणे : ट्रेनच्या धडकेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू तर एक महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी दिवा येथे घडली. दिवा फाटकाजवळ 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दीपक सावंत (26), गीता शिंदे (35) अशी या घटनेत मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. तर महादेवी जाधव (25) या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातात मृत व जखमी झालेले दिवा पूर्व परिसरातील रहिवासी आहेत. सकाळी कार्यालयात जाण्यासाठी ते निघाले असतांना हा अपघात घडला.
कामानिमित्त कार्यालय गाठण्याची घाई असल्याने दीपक सावंत, गीता शिंदे आणि महादेवी जाधव हे तिघेही रूळ ओलांडत होते. त्याचवेळी खोपोलीच्या दिशेने जाणारी 8 वाजून 21 मिनिटांची खोपोली जलद लोकल ट्रेन येथून जात होती. या गाडीची धडक या तिघांना बसली. या अपघातात दीपक सावंत आणि गीता शिंदे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर महादेवी जाधव ही महिला गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारार्थ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघेही नागरिक दिवा पूर्व परिसरातील रहिवासी आहेत. या घटनेने दिवा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दिवा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच येथील 80 टक्क्यांहून जास्त लोकसंख्या ही पूर्वेला राहतात. मात्र पूर्वेकडे रेल्वेचे एकमेव तिकीट घर मात्र पश्चिमेला आहे. त्यामुळे बहुतेक प्रवासी तिकिट काढण्यासाठी सर्रास रेल्वेरूळ ओलांडताना दिसतात. मुंबई दिशेकडील दिवा पूर्वला उतरणारा जिना रुंद करावा अशी मागणी दिव्यातील प्रवासी संघटनेतर्फे सातत्याने केली जात आहे. मात्र अद्याप तशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळेच वारंवार येथे अपघात घडतात असा आरोप नागरिकांनी केला. दिवा स्थानकात जर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पर्याप्त व्यवस्था केली नाही तर भविष्यात दिवा स्थानकात केव्हाही प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी दिला आहे.