* म्हस्के की रेपाळे, मुल्ला की देसाई, मणेरा की ओवळेकर? प्रभागात प्रश्न!
* माजी उपमहापौर पल्लवी कदम यांचा पत्ता कट
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या आरक्षण सोडतीत माजी महापौर, उपमहापौर तसेच सेना-राष्ट्रवादीतील दिग्गजांना त्यांच्या प्रभागात जागेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. मात्र प्रभागांच्या मोडतोडीमुळे त्यांना अन्य प्रभागात पर्याय उपलब्ध झाल्याने त्यांची चिंता मिटली आहे.
ठाणे महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी डॉ. काशिनाथ घाणेकर येथे पार पडली. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के, स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर, देवराम भोईर, सुहास देसाई, भाजपचे मनोहर डुंबरे आदींसह इतर माजी नगरसेवक उपस्थित होते. प्रभाग आरक्षणात अनेक दिग्गजांना फटका बसेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात आरक्षण सोडतीनंतर उपस्थितांसह अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. काही प्रभाग असे झाले आहेत की त्याठिकाणी प्रस्थापितांना तर संधी मिळणार आहेच, शिवाय त्यांच्या कुटुंबातील इतरांना देखील तिकीट मिळावे यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान नगरसेवकांना संधी नाही असे चित्र दिसत असले तरी प्रभागांची मोडतोड झाल्याने त्यांना इतर प्रभागात संधी उपलब्ध झालेली आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये तीन पैकी दोन वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नरेश मणेरा आणि सिध्दार्थ ओवळेकर यांच्यापैकी एकालाच संधी मिळणार आहे. परंतु दुसरीकडे प्रभाग क्रमांक पाच मध्ये मात्र यातील एकाला संधी उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे प्रभाग क्रमांक १८ मध्ये दोन वॉर्ड महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे येथे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला किंवा सुहास देसाई यापैकी एकालाच या ठिकाणी संधी मिळणार आहे. परंतु याठिकाणी महिलांसाठी आरक्षित झालेल्या वॉर्डात दोघांपैकी एक जण आपल्या पत्नीला संधी देऊ शकणार आहेत. तर प्रभाग क्रमांक २७ मध्ये अनुसुचित जाती, सर्वसाधारण महिला आणि पुरुष असे आरक्षण आल्याने याठिकाणी तत्कालीन महापौर नरेश म्हस्के आणि विकास रेपाळे यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे. त्यामुळे या एका जागेसाठी रेपाळे यांना माजी महापौरांशी समझोता करावा लागणार आहे. परंतु दुसरीकडे प्रभाग क्रमांक २२ मध्ये या दोघांपैकी एकाला संधी मिळु शकेल. प्रभाग क्रमांक २९ मध्ये माजी उपमहापौर पल्लवी कदम यांना मात्र धक्का बसल्याचे दिसून आले आहे. हा प्रभाग अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती (महिला) आणि पुरुष असा आरक्षित झाल्याने पल्लवी कदम यांचा पत्ता कट झाला आहे. परंतु त्यांचे पती पवन कदम यांना मात्र संधी मिळू शकणार आहे.
दिव्यात नव्याने सेनेत आलेल्यांनाही संधी
दिव्यात शिवसेनेला अपेक्षित असलेले प्रभाग आधीच तयार झालेले आहेत. तर आता आरक्षणातही शिवसेनेच्या बाजूने झुकते माप पडल्याचे दिसून आले आहे. प्रभाग क्रमांक ४३,४४ आणि ४५ मध्ये अपेक्षेनुसार आरक्षण पडले आहे. याठिकाणी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह भाजपमधून शिवसेनेत डेरेदाखल झालेले आदेश भगत आणि निलेश पाटील यांना देखील संधी मिळणार आहे. परंतु शिवसेनेच्या येथील तत्कालीन नगरसेवकांपैकी आता कोणाला संधी द्यायची असा पेच शिवसेनेपुढे असणार आहे. या ठिकाणी महिलांसाठी देखील आरक्षण पडले असल्याने त्याठिकाणी तत्कालीन नगरसेवकांच्या पत्नीला संधी द्यावी लागणार आहे.
घोडबंदर आणि दिव्यात महिलाराज
ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा आणि घोडबंदर परिसरातील लगतच्या प्रभागांमध्ये तीनपैकी दोन ठिकाणी सलग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण मिळाले असल्याने या भागात ‘महिलाराज’ दिसून येणार आहे. दिवा आणि मुंब्र्याशी जोडणाऱ्या प्रभाग क्रमांक ४१ ते ४७ प्रभागांमध्ये अनुसूचित जातीचा अपवाद एक वगळता तीन पैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे येथील २१ नगरसेवकांपैकी १३ जागा महिलांसाठी आरक्षित असून आठ जागा सर्वसाधारण प्रकारासाठी असणार आहेत. तर घोडबंदर पट्ट्यातील प्रभाग क्रमांक १ ते ६ पैकी प्रभाग क्रमांक ४ चा अपवाद वगळता इथेही महिलांचे प्राबल्य दिसून येत आहे. घोडबंदर परिसरातील प्रभागांमधून निवडून येणाऱ्या १८ पैकी १० नगरसेवक महिला असणार आहेत. त्यामुळे दिवा-घोडबंदरमध्ये महिलांचे वर्चस्वस दिसून येत आहे.
प्रभाग १८मधील दोन वार्ड महिलांसाठी राखीव झाल्याने एकाच पुरुष उमेदवाराला येथून उमेदवारी मिळू शकते. असे असले तरी निवडणूक लढवायचीच, मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे या प्रभागातील माजी नगरसेवक सुहास देसाई यांनी सांगितले.
प्रभाग २२ मध्ये आमच्या कार्यक्षेत्रातील ६० टक्के भाग आहे, त्यामुळे आरक्षणामुळे प्रभाग २७ मध्ये कुणाला संधी मिळणार नसेल तर अन्य ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे. मी शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्ष जो आदेश देईल तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया प्रभाग २७ मधील माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी दिली.