ठाण्यात नालेसफाई अपूर्णच नाल्यात क्रिकेट खेळून मनसेने केला निषेध

ठाणे: आयुक्तांच्या पाहणीनंतर नाले सफाईचे काम बंद करण्यात आले असून गांधी नगर येथील नाला अर्धवट साफ करून ठेकेदाराने पोबारा केला. या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी नाल्यात क्रिकेट खेळत पालिकेच्या कारभाराचा निषेध केला.

ठाणे महानगरपालिकेने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईचे काम हाती घेतले असून प्रभाग समितीचे अधिकारी महापालिका आयुक्त यांच्या डोळ्यांत धूळ फेकत असल्याचे समोर येत आहे. ठाण्यातील गांधीनगर येथे मुख्य नाला आहे. या नाल्याच्या परिसरात सुमारे १० हजार झोपडपट्ट्या असून या परिसरातील सर्व उपनालेही तुडुंब घाणीने भरलेले दिसून येतात. गांधीनगरमधील मुख्य नाल्याची सफाई आयुक्तांसमोर करण्यात येत होती. मात्र आयुक्त पाहणी करून गेले तसे ठेकेदारांनीही काम थांबवत नालेसफाई बंद केली. आतापर्यंत या नाल्याची सफाई पूर्ण करण्यात आली नसून सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीने या नाल्यात उतरून ‘हो मी आहे जबाबदार‘ चे फलक आयुक्तांच्या फोटो सहित प्रदर्शित केले. आंदोलनाच्या माध्यमातून महापालिकेच्या नाले सफाईचा आणि आयुक्तांकडून करण्यात आलेल्या दौऱ्याचा निषेध करत नाल्यात उतरून क्रिकेट खेळण्यात आले.

पालिकेच्या दरवर्षी नालेसफाईच्या गलथान कारभाराविरोधत मनसेच्या वतीने आवाज उठविला जात असून आयुक्तांनी याबाबत लक्ष घालण्याची मागणी महिंद्रकर यांनी केली आहे.
या अनोख्या आंदोलनात मनसेचे अवदेश सिंह, देवेंद्र कदम, किशोर पाटील, हिरा पासी, राजकुमार गौड, विनोद सोनावणे, राजू गुप्ता, संतोष वाल्मीकी, विवेक गौतम, वैभव ठाकरे सहभागी झाले होते.

महापालिकेने या नाले सफाईबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर योग्य ती कारवाई न केल्यास मनसेच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महिंद्रकर यांनी दिला आहे.