ई-स्कुटर्सचा वेग वाढवून देणा-या डिलर्सवर होणार कारवाई; सुमारे ५० दुचाकी जप्त

ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून ठाणे व लगतच्या अन्य शहरांमध्ये ई स्कुटर्सचा बोलबाला झाला असतानाच काही विक्रेत्यांनी, घाऊक डिलर्सनी ताशी २५ किमी किंवा त्यापेक्षा कमी वेगाने धावणा-या स्कुटर्सचा वेग वाढवून देण्याची ‘करामत’ केली आहे. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ४० ते  ५० दुचाकी जप्त करुन, ठाणे परिवहन अधिका-यांनी त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याची तयारी केली आहे. अशा स्कुटर्स ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर, कल्याण आदी शहरांमध्ये आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ई स्कुटर्सना केंद्र सरकारची मान्यता असली तरीही, देशातील काही संस्थांनीदेखील या ई बाईक्सना वापरण्याची मान्यता दिली आहे.
२३ आणि २४ मे रोजी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिका-यांनी संपूर्ण राज्यातील ई बाईक्ससंबंधी मोहिम हाती घेतली होती. ई स्कुटर्सचा वेग निर्धारित केल्यापेक्षाही जास्त वेग वाढवलेल्या ५० दुचाकी गेल्या दोन दिवसांत सापडल्या. त्यानंतर ज्या ई स्कुटर्सचा वेग २५ आहे, त्यांचाही शोध घेण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे

ताशी २५ किमी या वेगाने धावणा-या इलेक्ट्रिक स्कुटर्सना परिवहन विभागाकडून नोंदणी करण्याची आणि अन्य परवाने घेण्याची आवश्यकता नाही. त्याचा गैरफायदा घेऊन काही डिलर्सनी मुळच्या २५० वॅट बॅटरीच्या आणि स्विचेस्मध्ये दुचाकी वाहनात फेरफार करुन या स्कुटर्सचा वेग २५ पेक्षा जास्त वाढवल्याचे आणि वेग वाढवण्याकरीता बॅटरींमध्ये बदल केले आहेत असे उघडकीस आले. ई स्कुटर्समध्ये असे बेकायदेशीर बदल करणे नियमबाह्य आहेच शिवाय ते धोकादायकही आहे. अशा स्कुटर्सना आग लागू शकते अशी माहिती ठाणे परिवहन अधिका-यांनी दिली.
अशा दुचाक्या शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ परिवहन अधिका-यांना परिवहन आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार इलेक्ट्रिक दुचाक्यांच्या उत्पादकांनी आरटीओने मान्यता दिलेल्या संस्थेचे प्रमाणपत्र घेणे अत्यावश्यक आहे. तरीदेखील ५० डिलर्सनी ई स्कुटर्समध्ये बदल केल्याचे निदर्शनास आले, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

ई स्कुटर्सचा वेग वाढवून देणा-या डिलर्सवर परिवहन अधिका-यांवर कारवाई होणारच परंतु, अनधिकृत विक्रेत्यांकडून ई बाईक्स खरेदी करु नका, असा इशारा ठाणे प्रादेशिक परिहवन अधिका-यांनी दिला आहे. ई बाईक्समध्ये असे कोणतेही फेरफार केले असतील तर ते त्वरीत मूळ स्थितीत बदलावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.