ठाणे: मंकी पॉक्स या आजाराचा भारतामध्ये अद्याप एकही रुग्ण आढळलेला नसून ठाणे शहरात भविष्यामध्ये या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी घाबरून न जाता मंकीपॉक्स या आजाराचा प्रसार शहरात होऊ नये याकरीता स्वतःची काळजी घेत सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार जगातील यु.के, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आदी देशांमध्ये मंकीपॉक्स या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये या आजाराचे रुग्ण अद्याप आढळलेले नाहीत. परंतु भविष्यामध्ये या आजाराचा प्रादुर्भाव देशात होऊ नये याकरिता विशेष प्राधान्याने उपाययोजना करणे आवश्यक असून ठाणे महापालिकेने त्याअनुषंगाने तयारी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत मंकीपॉक्स या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तसेच पूर्वतयारी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून, सदर कक्षामध्ये एकूण ११ खाटा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मंकीपॉक्स रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणारी औषधें व साधनसामग्री आरोग्य विभागाकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
या आजाराचे निदान करणेसाठी विलगीकरण कक्षामार्फत नमुने गोळा करून पोस्ट कोविड सेंटर येथील मध्यवर्ती प्रयोग शाळमार्फत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांचे कॉन्टैक्ट ट्रेसिंग आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येणार आहे.
ठाणे शहरातील सर्व खाजगी रुग्णालये व महापालिका दवाखाने, रुग्णालये येथील वैद्यकीय व्यावसायिकांना मंकीपॉक्स आजाराबद्दल माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागामार्फत परिपत्रक काढण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा मंकीपॉक्स या आजारावर नियंत्रण ठेवणेसाठी सज्ज असून, नागरिकांनी घाबरून न जाता मंकीपॉक्स या आजाराचा प्रसार ठाणे शहरात होऊ नये याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
काय आहेत मंकी पॉक्सची लक्षणे?
मंकीपॉक्स हा विषाणूजन्य आजार असून या आजाराची प्रमुख लक्षणे ताप, शरीरावरील पुरळ व लसिका गाठीवरील सुज अशी आहेत. सदरहु आजार हा स्वत:ला मर्यादित करणारा असून या आजारामुळे मृत्यु पावण्याचा दर १ ते १० टक्के असा आहे. सदर आजाराचा उद्भावन कालावधी ७ ते १४ दिवस असा असून हा आजार प्राण्यांपासून मनुष्यास व मनुष्यापासून मनुष्यास प्रसारित होऊ शकतो. या आजाराचे विषाणू खरचटलेली त्वचा किंवा श्वसनावाटे शरिरामध्ये संक्रमण करतात. विषाणूजन्य शारिरीक द्रव्ये उदा जखमेतून होणारा स्त्राव , शारिरीक द्रव्य इद्यादीच्या संपर्कात आल्यानंतर विषाणू शरिरामध्ये पसरुन मंकीपॉक्स आजार होतो. रुग्णांमध्ये लक्षणे दिसण्याच्या १ ते २ दिवस अगोदरपासून पुढे पुरळांवरील खपली निघून जाईपर्यंत एका रुग्णापासून दुस-या व्यक्तीपर्यंत या आजाराचा प्रसार होऊ शकतो.
मंकीपॉक्सपासून संरक्षण होण्यासाठी काय करावे?
* मंकीपॉक्स बाधित रुग्णांशी सहवास टाळावा.
* हात पाणी व साबणाने स्वच्छ धुवावेत.
* आजारी रुग्णांचे कपडे, चादरी, टॉवेल, भांडी आदीचा वापरु नयेत.
* मांसाहार करताना मांस पूर्णपणे शिजलेले असावे.
* रुग्णांची देखभाल करताना आवश्यकतेनुसार पीपीई उदा . मास्क, ग्लोव्हज इ.चा वापर करावा.
* मृत किंवा आजारी व्यक्ती जंगली प्राण्यांच्या संपर्कात येऊ नये