ठाणे : अगं अगं म्हशी , मला कुठे नेशी ही म्हण सर्वश्रुत आहे. पण चक्क दोन म्हशींनीच एक लोकल आणि तीन लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस रोखल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक ‘घसरले’. हा प्रकार निस्तरताना कर्मचाऱ्यांच्याच तोंडाला फेस आल्याची वेळ आली.
सायंकाळी सव्वा पाच वाजता एक लोकल अप मार्गावरुन भिवपूरी रोडहून नेरळकडे अप मार्गावरुन जात असताना चक्क दोन म्हशी रेल्वे मार्गावर आल्या. लोकलच्या मोटरमनने गाडीचा वेग कमी केला. लोकलमागून पुण्याहून सीएसएमटीकडे येणा-या डेक्कन एक्स्प्रेसच्या चालकाने गाडी प्रसंगावधान राखून गाडी काही अंतरावर थांबवून पुुढचा अनर्थ टाळला. तरीही म्हशी कधी रुळांवर तर कधी रुळांच्या जवळ धावत होत्या. अखेरीस लोकल थांबवावी लागली. त्यामुळे त्यापाठोपाठ येणा-या नागरकोईल-सीएसएमटी आणि दौंड- इंदूर एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्याही रोखाव्या लागल्या. ही वेळ सायंकाळी ५.१५ नंतर असल्यामुळे कर्जतहून कल्याणकडे जाणा-या लोकल सेवांना फटका बसला.
अखेरीस हा सर्व प्रसंग सायंकाळी ६.४५ वाजता निस्तरण्यात आला आणि रखडलेली लोकल आणि मेल-एक्स्प्रेस कल्याणहून पुढे जाणा-या गाड्यांची वाहतूक सुमारे पाऊण-एक तास उशीराने सुरु होती.