ठाणे : माथेरान हे मुंबईकरांसाठीच नव्हे तर पुणे आणि नाशिककरांसाठीही सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या प्रवासासाठी शटल सेवेचा वापर तीन लाखांहून अधिक प्रवाशांनी करुन, पर्यटनाला संमिश्र प्रतिसाद दिला. त्यामुळे सन २०२१- २०२२ मध्ये हे ठिकाण एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मध्य रेल्वेने एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान तीन लाख ६,७६३ प्रवाशांची वाहतूक केली आणि अमन लॉज ते माथेरान दरम्यान आठवड्याच्या दिवशी एकूण १६ सेवा आणि वीकेंडला २० सेवांसह ४२ हजार ६१३ पॅकेजेसची वाहतूक केली आहे. शिवाय पर्यटकांना आरामदायी प्रवास देण्यासोबतच, या सेवा स्वस्त आणि जलद साहित्याची वाहतूक करण्यासही मदत करतात. यामुळे एप्रिल-२०२१ ते मार्च २२ या कालावधीत तब्बल १ कोटी ८२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये ३.२९ लाख पार्सल कमाईचा समावेश आहे.
माथेरानला पर्यटनाकरीता जाणा-या प्रवाशांसाठी हिवाळी सुट्टी हा सर्वात योग्य काळ असतो. नोव्हेंबर-२०२१ हा महिना २७ लाख ६५ हजार रुपये प्रवाशांच्या कमाईसह ४२ हजार २१ प्रवासी घेऊन अव्वल स्थानावर आहे आणि त्यानंतर डिसेंबर-२०२१ महिन्यात प्रवाशांच्या कमाईसह २७ लाख ११ हजार रुपये कमाईसह ४३ हजार ५०० प्रवाशांनी येथे भेट दिली.
नेरळ ते अमन लॉज टॉय ट्रेन पुन्हा सुरु केव्हा करणार?
‘हौसेला मोल नसल्यामुळे या १८ मिनिटांच्या प्रवासासाठी प्रत्येक प्रवासी ४५ रुपये मोजतात, तर नेरळहून माथेरानपर्यंतच्या प्रवासासाठी प्रत्येकी फक्त ७५ रुपये मोजावे लागतात. ते देण्याची आमची सदैव तयारी आहे. हजारो प्रवाशांच्या मुख्यत: बच्चेकंपनींच्या आवडीची नेरळ स्थानक ते अमन लॉज दरम्यान टॉय ट्रेन पुन्हा सुरु केव्हा करणार, ती लवकरच सुरु कण्याची अपेक्षा मध्य रेल्वेकडून करु शकतो का, असा सवाल अनेक प्रवासी करत आहेत. अमन लॉज ते माथेरान ते अमन लॉज या फक्त १८ मिनिटांच्या प्रवासाकरीता प्रत्येकी ४५ रुपये द्यावे लागत असतील तर नेरळ ते माथेरानच्या प्रवासासाठी आणखी ३० रुपये मोजण्याची आमची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याहून माथेरान सफरीसाठी नियमित येणा-या संपदा सलागरे यांनी ‘ठाणेवैभव’कडे व्यक्त केली.
बाजारवाल्यांचा माल फक्त दस्तुरीपर्यंतच नेरळ ते माथेरानपर्यंत येणारी आणि खाली जाणारी टॉय ट्रेन सेवा गेल्या २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या विनाशामुळे बंद झाली आहे. त्यानंतर दोन वर्षांनी, लोकप्रिय नेरळ-माथेरान टॉय ट्रेन मार्गावरील पुनर्बांधणीचे काम नोव्हेंबर- डिसेंबर २०२२ च्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे कल्याण, नेरुळहून माथेरानला जाणारा विविध प्रकारचा घाऊक माल, भाजीपालाही फक्त दस्तुरीपर्यंतच नेला जातो. तेथून पायवाटेने किंवा तो हातगाडी, हात रिक्षेने गिरीस्थानापर्यंत नेला जात आहे.