ठाणे: सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत म्हणजेच दिवाळीपर्यंत भाईंदर ते वसई-ठाणे या मार्गावर प्रवासी जलवाहतूक सुरु होण्याच्या दृष्टीने काम अंतिम टप्यात आले आहे. वरसावे येथे प्रवासी जेट्टीचे काम सुरु असून ते जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर जल वाहतूक सुरु होऊ शकते, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी पाहणी दौऱ्यात सांगितले.
केंद्र सरकारच्या ‘सागरमाला’ योजनेअंतर्गत व राज्य सरकारच्या निधीतून जल वाहतूक प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्यात ठाणे-भाईंदर-वसई-डोंबिवली ही शहरे जल वाहतुकीने जोडली जाणार आहेत. मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत वरसावे येथे प्रवासी जेट्टीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. ५० मीटर बाय ७.५ मीटरची जेट्टी बांधली गेली असून ही जेट्टी झाल्यानंतर येथे प्रवासी बोट उभी राहू शकेल व जल वाहतूक सुरु होऊ शकेल. या प्रवासी जेट्टीसाठी जवळपास सात कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
जुलैपर्यंत या जेट्टीचे काम पूर्ण करून ऑगस्ट-सप्टेंबरपासून जलवाहतूक सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. या जेट्टी परिसरात प्रवासी येतील व प्रवासी बोटीने जातील. जेट्टी परिसर सुशोभित व्हावा म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांनी ५० लाखांचा निधी दिला आहे. त्यात राज्य सरकारचे २५ लाख व आमदार निधी २५ लाख असणार आहे. या जेट्टी परिसरात लॅन्डस्केपिंग गार्डन, प्रवाशांना बसण्याची जागा, गेम झोन, फूड स्टॊलसाठी जागा, शोभिवंत झाडे अशा सुविधांच्या माध्यमातून सुशोभीकरण केले जाणार आहे. या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आज आमदार प्रताप सरनाईक व मेरी टाइम बोर्डाच्या अधिकारी, स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. हॉटेल फाउंटनच्या समोर मुख्य रस्त्यापासून प्रवासी जेट्टीपर्यंत जाण्यासाठी १२ मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात यावा, अशी सूचना आमदार सरनाईक यांनी मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
भाईंदर, कोलशेत, काल्हेर, डोंबिवली या जेट्टीच्या कामांना पहिल्या टप्प्यात राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. टप्प्या टप्प्याने या प्रवासी जेट्टीची कामे वर्षभरात पूर्ण होणार असून या सर्व जेट्टींची कामे पूर्ण झाल्यानंतर जलवाहतुकीने हे सर्व भाग जोडले जाणार असून पूर्ण क्षमतेने जल वाहतूक सुरु होऊ शकणार आहे. २००९ मध्ये आमदार म्हणून विजयी झालो तेव्हा सर्वप्रथम मी जलवाहतूक सुरु करण्याचा शब्द नागरिकांना दिला होता. ही संकल्पना लोकांना नवीन वाटली. आता प्रत्यक्षात जल वाहतुकीच्या कामाला गती मिळाली असून दिवाळीपर्यंत अशंत: जल वाहतूक सुरु होईल, असा विश्वास आमदार सरनाईक यांनी व्यक्त केला. भाईंदरच्या जेसल पार्क येथे प्रवासी जेट्टीला मंजुरी मिळाली असून पर्यावरण विषयक दाखले मिळवण्याचे काम सुरु आहे. जेसल पार्क जेट्टीसाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित असून निविदा प्रक्रिया करून येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.
या शहरांना जलवाहतुकीने जोडले जाणार
प्रवासी जेट्टींची कामे मार्गी लागल्याने भाईंदर पश्चिम, भाईंदर जेसल पार्क, वरसावे, गायमुख, कोलशेत ते नवीमुंबई, डोंबिवली, वसई-विरार या शहरांना जलवाहतुकीच्या माध्यमातून येत्या काही महिन्यात जोडले जाणार आहे.
या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे, उप अभियंता प्रशांत सानप आदी उपस्थित होते.