‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोमध्ये दया भाभी चं होणार पुनरागमन!

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Kumarr Modi) यांनी या मालिकेच्या चाहत्यांना आता आनंदाची बातमी दिली आहे.

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते. ही मालिका सध्या चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, अनेक कलाकार सध्या ही मालिका सोडून जाण्याचा निर्णय घेत आहेत. ताही दिवसांपासून मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ही मालिका सोडणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. तर शैलेश लोढा यांनी देखील हा शो सोडला आहे, असंही म्हटलं जात आहे. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Kumarr Modi) यांनी या मालिकेच्या चाहत्यांना आता आनंदाची बातमी दिली आहे. शोमध्ये आता पुन्हा जेठालाल आणि दया यांची जोडी गोकुलधाममध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे.

काय म्हणाले असित मोदी?

असित मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं, ‘दयाबेन ही भूमिका परत मालिकेत न आणण्याचं आमच्याकडे कोणतही कारण नाही. 2020 आणि 2021 हा अनेकांसाठी कठिण काळ होता. पण आता 2022 मध्ये चांगल्या काळाची सुरूवात झाली आहे. आता लवकरच दया तुमच्या भेटीस येणार आहे. आता प्रेक्षक पुन्हा दया आणि जेठालालची जोडी पाहू शकणार आहेत.

पुढे ते म्हणाले, ‘ दिशा वकानी  ही दयाची भूमिका साकारेल की नाही?  हे मी सांगू शकत नाही. दिशाजी या आमच्या कुटुंबातील सदस्यासारख्या आहेत. पण आता त्यांचे लग्न झालं आहे. त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. पण दिशा बेन असो किंवा निशा बेन दया ही शोमध्ये परत नक्की येणार. कारण आम्हाला लोकांचे मनोरंजन करायचे आहे. ‘

28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच या मालिकेमधील कलाकारांची विनोदी शैली नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.