ठाणे: ठाणे महापालिकेच्या अंतिम आराखड्यावर सही न करणे महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या अंगलट आले असून निवडणूक विभागाकडून त्यांना नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये सही न करण्यामागचा खुलासा मागवला आहे.
निवडणूक विभागाच्या या पत्रामुळे पालिका अधिकाऱ्यांची देखील चांगलीच धावपळ उडाली होती. अखेर प्रशासनाने खुलासा पाठवला असून निवडणूक विभाग त्यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून १४ मे रोजी ही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध देखील करण्यात आली आहे. यापूर्वीच आपापल्या पक्षाला अनुकूल असे प्रभाग तयार करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी फिल्डिंग लावली होती. ज्यावेळी प्रारूप आराखडा तयार करण्यात आला, त्यावेळी देखील या प्रभाग रचनेवर १९६२ जणांनी आक्षेप घेतले होते. हरकती सूचनांवर सुनावणी देऊन निवडणूक विभागाने अंतिम आराखडा पालिका प्रशासनाकडे पाठवला होता.
या आराखड्यावर मुख्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान, पालिका उपायुक्त, नगर रचना सहाय्यक संचालक तसेच महापालिका आयुक्त यांची सही अनिवार्य आहे. मात्र पालिका आयुक्त सोडून या तिघांचीच अंतिम आराखड्यावर सही होती. त्याची दखल घेऊन राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांना खुलासा करावा, अशी नोटीस पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी निवडणूक आयोगाला खुलासा देखील पाठवला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त यांनी पाठवलेला खुलासा निवडणूक विभाग मान्य करतात की अन्य कोणती कारवाई प्रस्तावित करतात याकडे महापालिकेचे लक्ष लागले आहे.
‘ठाणेवैभव’ने त्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.